Pune Mayor: 'पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंनी हेडगेवारांच्या फोटोला हार घातला, शाहू महाराजांच्या तसबिरीला पुष्पहार घातलाच नाही, पत्रकारांनी विचारताच हसत म्हणाल्या'... काँग्रेसचा आरोप
या प्रकरणावर महापौर मंजुषा नागपुरे पुढे काय स्पष्टीकरण देतात, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pune: पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वर्तनावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होताना दिसतोय. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महापालिकेत असलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला; मात्र शेजारी असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घातल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून महापौरांवर टीकेची झोड उठली असून सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. काँग्रेस कार्यकर्ते भाऊसाहेब आजबे यांनी पुणे महापौरांवर शाहू महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा ठपका ठेवत ट्वीटही केले आहे.
नेमकं काय घडलं?
महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेतील काही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. यामध्ये डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला त्यांनी हार घातला; मात्र त्याच ठिकाणी असलेल्या छत्रपती शाहू महाराज, स्व. राजीव गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला नसल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते भाऊसाहेब आजबे यांनी महापौरांवर अवमानाचा आरोप करत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चर्चेत आहे.
महापौर मंजुषा नागपूरे यांच्याकडून शाहू महाराजांचा अवमान!
— Bhausaheb Ajabe (@BhausahebAjabe) February 25, 2026
पुणे महापालिकेत नागपूरे यांनी हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला पण जाणीवपूर्वक शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला नाही.
पत्रकारांनी त्यावर आक्षेप घेतल्यावर त्या खिदळत आहेत.@INCHarshsapkal @satejp pic.twitter.com/p3zeybepJf
या वादाबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता महापौर नागपुरे यांनी हसत प्रतिक्रिया दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच त्यांनी हा विषय प्रोटोकॉलमध्ये नसल्याचा उल्लेख केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत महापौरांकडून अधिकृत सविस्तर स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. काँग्रेस कार्यकर्ते भाऊसाहेब आजबे यांनी ट्विट करत पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महापुरुषांचा अपमान झाल्याचा ठपका त्यांनी ठेवलाय.
कोणत्याही शहराचा महापौर हा जाती-धर्माच्या चौकटीत अडकलेला नसतो. पदावर बसल्यानंतर सर्व महापुरुषांचा समान आदर राखणे अपेक्षित असते. महापौरांनी यापुढे तरी सर्व महापुरुषांकडे समान दृष्टीने पाहून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणावर महापौर मंजुषा नागपुरे पुढे काय स्पष्टीकरण देतात, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
























