पुणे : राज्यात एकीकडे तपोवनातील वृक्षतोडीवरुन गदारोळ माजली असताना पुणे (Pune) जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातून आणखी एक नवीन प्रकरण समोर आलंय. आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या वनीकरणासाठी आरक्षित असलेल्या जमिनीत विनापरवाना अनधिकृत उत्खनन करुन हजारो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे, असा थेट आरोप उद्योजक रणजित काकडे यांनी केलेला आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके (Sunil shelke) यांच्यावर कारवाई करणार का ? असा सवाल देखील विचारला आहे.
नानोली, मावळ येथील जमिनी वनीकरणासाठी आरक्षित श्रेणीत येतात. या जमिनीमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उत्खनन करण्यात आल्याचा दावा रणजित काकडे यांनी केला आहे. या जमिनी आमदार सुनील शेळके यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या असून तेथे अनधिकृत उत्खनन केलेले आहे. मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरण नुकतेच अधिवेशनात गाजले. आमदार सुनील शेळके यांनीच या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती आणि त्यावर महसूल विभागाने ताबडतोब मोठी कारवाई केली आहे. 4 तहसीलदार आणि 10 तहसील अधिकाऱ्यांचे निलंबन केले. याच पार्श्वभूमीवर आता त्याच आमदार सुनील शेळके यांच्यावर महसूल विभाग कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. या कथित उत्खनन प्रकरणावर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार ? सखोल चौकशी होणार का ? कायदेशीर कारवाई होईल का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
संवैधानिक पदावरील विश्वासाचा गैरफायदा घेवून माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांना आमदार महोदयांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे, आपल्या पदाचा गैरवापर केला म्हणून आमदार सुनिल शेळके राजीनामा देणार का? अशी विचारणा देखील रणजीत काकडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधीच्या कुटुंबीयांच्या संबंधित जमीन आणि त्यावर अनधिकृत उत्खनन हे प्रकरण महसूल विभागाने गांभीर्याने घेऊन सखोल चौकशी करून त्यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.
हेही वाचा
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी