पुणे : मकरसंक्रात अवघी आठवड्यावर आली असताना पतंगाच्या मांज्याचे दुष्परिणाम पुन्हा समोर आले आहेत. पुण्यात दुचाकीस्वार चिमुरड्याच्या डोळ्याला मांजाने कापल्यामुळे गंभीर इजा झाली आहे.

पतंगाचा मांजा किती धोकादायक ठरु शकतो, याची उदाहरणं संक्रांतीच्या काळात वारंवार पाहायला मिळतात. पुण्यातल्या काळेवाडीत दुचाकीवरुन जाणाऱ्या लहान मुलाच्या डोळ्याला रस्त्यावर लटकणारा मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.

मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या हा चिमुरडा त्याच्या नातेवाईकासोबत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. नातेवाईकाच्या दुचाकीवर हा चिमुरडा समोर बसला होता. काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर इथे आल्यावर रस्त्यावर लटकत असणारा मांजा त्याच्या डोळ्यावर कापल्याने त्याला गंभीर इजा झाली.

दुचाकीचा वेग कमी असला तरी अचानक झालेल्या या घटनेने तो गाडीवरुन खाली कोसळला. मांजा थेट डोळ्यात घुसल्याने चिमुरड्याच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.