Pune-Lonavala News: दिल्लीहून लोणावळ्याला सहलीसाठी आलेला तरुण 20 मे रोजी बेपत्ता झाला होता. मागील तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. अखेर आज त्याचा मृतदेह लोणावळ्याच्या जंगलात सापडला होता. फरहान शहा असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो दिल्लीहून लोणवळ्यात सहलीसाठी आला होता. फिरायला गेल्यानंतर तो हरवला. लोणावळा पोलीसांसह इतर काही स्थानिक पथकांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो मृतावस्थेत सापडला.


लोणावळ्यात का आला?
फरहान हा मुळचा दिल्लीता असून तो कामासाठी कोल्हापूरला आला होता. मात्र महाराष्ट्रातील  लोणवळा हे ठिकाण प्रसिद्ध असल्याने त्याने फिरायला जाण्याचा बेत आखला. लोणावळ्यात जंगलसफारी करत असताना वाट चुकला होता. या सगळ्या संदर्भात त्याने कुटुंबीयांना माहिती दिली होती, असं त्यांचा कुटुंबीयांनी सांगितलं आहे.


वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून फरहानचा लोणावळ्यात शोध सुरु होता. त्यानंतर अखेर ड्यूक नोज या टुरिस्ट पॉईंटच्या खाली त्याचा मृतदेह आढळून आला. या पॉईंटवरुन तो ३००-४०० फुट खोल दरीत पडल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. वनविभागाचे अधिकारी या सगळ्याचा तपास सलग दिन दिवस करत होते. त्यानंतर इंजिनिअर असलेल्या फरहान शहाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून त्याची दुर्गंधी येत आहे. 


कुटुंबीयांनी दिली तक्रार
फरहान हा इंजिनिअर असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. तो मागील शुक्रवारपासून बेपत्ता होता. जंगलाची वाट चुकल्यानंतर ट्रेनच्या रुळावरुन उतरल्याची माहिती त्याने दिली होती. काहीच वेळानंतर त्याचा फोनही बंद झाला. फोन बंद लागल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत महिती दिली आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 


तीन दिवस राबवली मोठी शोधमोहिम 
लोणवळा फॉरेस्ट विभाग, NDRF, लोणावळा स्थानिक पोलीस आणि काही संघटनांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. या शोधमोहिमेसाठी तिन्ही पथकं जोमात कामाला लागली होती. या शोधमोहिमेसाठी ड्रोन आणि श्वानपथकाची मदत घेतली होती. अखेर तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर फरहानला शोधण्यात यश आलं.