Pune Leopard Attack: पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने प्रचंड दहशत पसरवली आहे. या बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा जीव घेतला होता. त्यामुळे सध्या वनविभागाकडून या नरभक्षक बिबट्याला (Leopard ) पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या बिबट्याला ठार मारण्याचे आदेशही वनविभागाने दिले होते. त्यासाठी शिरुर तालुक्यातील पिंपळखेड येथे वनखात्याचे एक पथकही दाखल झाले होते. याशिवाय, मंगळवारी मंत्रालयात यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा जीव जाऊनही पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) याठिकाणी न फिरकल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. 

Continues below advertisement

सरकारला बिबट्या जगवायचा आहे की माणूस जगवायचा आहे? असा खडा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आजवर 56 लोकांचे जीव गेलेत, त्यामुळे बिबट्या ठार करावा लागेल. कायद्यात बसत नसेल तर कायद्यात बदल करा. सरकार स्वतःसाठी नियम बदलते, तसाच याबाबतही नियम बदल करा, असा आक्रमक पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे. 

Junnar News: बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार?

जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे.  यासंदर्भात नेमकं काय नियोजन करता येईल? यासाठी वनमंत्री आणि लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्राणी आणि मानवाचा संघर्ष टाळण्यासाठी काय करता येणार यासंदर्भात बैठकीत चर्चा होईल. केंद्र सरकारच्या मदतीनं काही उपाययोजना करता येतात का? यासंदर्भात देखील आढावा घेतला जाणार आहे. वनमंत्री गणेश नाईक, वन विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहे. याशिवाय, पुढील चार-पाच दिवसांमध्ये वनमंत्री गणेश नाईक स्वतः जुन्नर परिसरात जात पाहणी करणार आहेत. ते यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊ शकतात.

Continues below advertisement

दरम्यान, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी काल पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला होता. तब्बल 16 तास नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते. अखेर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील आंदोलन स्थगित करण्यात आले.  मात्र, शेवटच्या बिबट्याचा बंदोबस्त लागेपर्यंत यापुढं ही वेगवेगळ्या मार्गाद्वारे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

आणखी वाचा

मंचरमध्ये नरभक्षक बिबट्या जेरबंद? शरीरात मानवी अंश असल्यास ठार करणार?