Pune-Lonavala Local News: पिंपरी चिंचवड (PCMC) रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी उर्फ भाईजान यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांना लोणावळा (lonavala) ते पुणे (Pune local) लोकल दुपारी 12: 45 ते 1 या वेळेत सुरू करण्याची विनंती केली आहे. तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. लोणावळा शहरातील सकाळचे सत्र दुपारी 12:15 वाजता संपते. लोणावळा परिसरात सुमारे 13 ते 14 प्राथमिक शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच विद्यार्थ्यांची संख्याही काही हजार आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या लोकलची मागणी केली जात आहे.
सर्व विद्यार्थी मावळ तालुक्यातील माळवली, कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, देहूरोड, आकुर्डी या दुर्गम भागातून शिक्षणासाठी येतात. देहूरोड, कासारवाडी तसेच पुणे येथूनही काही शिक्षक शाळेत येतात. सकाळी शाळेत येण्यासाठी लोकल गाड्या उपलब्ध आहेत पण काही शाळा दुपारी 12:15 वाजता संपत असल्याने पुण्यासाठी दुपारी 2:50 वाजता लोकल आहे. या विद्यार्थ्यांना जवळपास 2 तास रेल्वे स्टेशनवर बसावे लागते. यामुळे मुलांचा अभ्यासाचा वेळ वाया जातो आणि प्रवासाच्या थकव्यामुळे शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाणही वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी मुलाणी यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लोणावळा स्थानक ते पुण्यापर्यंत लोकल ट्रेन सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनानंतर सर्व लोकल टप्प्याटप्प्याने सुरु
पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वेविभागाने दिली आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान सध्या 13 जोड्या लोकल धावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात थांबलेल्या सर्व लोकल गाड्या अजून सुरू झालेल्या नाहीत. मात्र सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जातील. तसंच 8 ऑगस्टपासून आणखी चार लोकल ट्रेन सुरू झाल्या तर 15 ऑगस्टपासून सहा गाड्या सुरू झाल्या. पुणे-लोणावळा मार्गावरील आणखी चार लोकल ट्रेन 22 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या, असं पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले आहे. पुण्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.