पुणे : मुंबई, पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामध्ये, कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे (Pune) शहरातील अनेक मार्गावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, काही भागांत पावसाच्या वाहत्या पाण्यात दुचाकी गाड्याही वाहून गेल्याचं दिसून आलं. रस्त्याच्या कडेला, दुकानाच्या बाहेर लावलेल्या दुचाकी पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातानाचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे, मान्सनपूर्व पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवल्याचे चित्र दिसून आलं. सोशल मीडियावरही या पावसाचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या पावसामुळे दुकानांमध्ये पाणी गेलं आहे, रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होते. तर, हिंजवडी भागातही पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचल्याचे दिसून आले. पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होते, या पाण्याच्या वेगाने गाड्या देखील वाहून जात होत्या. पुण्यातील स्मार्ट सीटी प्रकल्पाचा भाग असलेल्या बाणेर भागात काही वेळ झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बाणेरमधील बीटवाईज चौकात अनेक वाहनं पावसाच्या या पाण्यात अडकली होती.
कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे उशिरा
रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रेल्वे ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला आहे. त्यामुळे, कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून आज संध्याकाळची ही घटना आहे. रेल्वे ट्रॅकवरच दरडी कोसळल्याने रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत, प्रशासनाकडून तातडीने दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. जवळपास दीड तास कोकण रेल्वे उशिराने धावणार आहे. गोव्याच्या दिशेने नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरीत थांबून असून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसही वैभववाडीत थांबून आहे, मुंबईकडे जाणारी तेजस एक्सप्रेस कणकवलीमध्ये थांबून आहे.
नाशिकमध्ये जोरदार, वृक्ष उन्मळून पडले
नाशिक शहर आणि परिसरात आज सायंकाळी 5 नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्याने शहरातील काही भागात वृक्ष उन्मळून पडले, काही भागात रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते, शहरातील उड्डाणपूलवरुन ही पावसाचे पाणी खालील रस्त्यावर पडत असल्याने वाहनचालकांची चांगलीच तारम्बल उडाली. तर गोदावरी नदी काठवरी पावसाळी गटारच्या चेंबरमधून गटाराचे पाणी बाहेर येऊन नदीपात्रात मिसळत असल्याने नदी प्रदूषणात आणखीच भर पडली. दोन तासात शहर परिसरात 30 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून 25 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहत होता.
पाहा व्हिडिओ - https://youtube.com/shorts/q7DuL0EOdq8?feature=shared
पश्चिम मुंबईत पाणी साचले
मुंबईतील पश्चिम उपनगरात अर्धा तासापासून सुरू असलेला मुसळाधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मान्सूनपूर्व पावसामध्ये अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने नाले सफाईचा कामावर लोकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तर, वाहतूक पोलिसांचीही तारांबळ दिसून आली.
हेही वाचा
शेतात वीज कोसळून कांद्याची बराख जळाली, आग विझवण्यासाठी बळाराजाची धावाधाव; वादळवाऱ्यात मोठं नुकसान