सागर पिंगळे असं मृत्युमुखी पडलेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. पुण्यातील कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाची दहीहंडी साजरी करुन सागर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर घरी जाण्यासाठी निघाला. तो दुचाकीवर मागे बसला होता. मात्र श्रीकृष्ण मंडळाजवळच तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला.
सागरला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मुंबईजवळच्या पालघरमध्ये एक, तर नवी मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. 117 गोविंदांना दुखापत झाल्याची माहिती आहे.
पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. धनसार काशीपाडा येथील रोहन गोपीनाथ किणी या 21 वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले. दहीहंडीत थरावरुन उतराना फीट आल्याने तो जागीच कोसळला होता.
नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये शॉक लागून एका गोविंदाचा मृत्यू झाला. जयशे शरले असं या गोविंदाचं नाव आहे.
मंडळाच्या ठिकाणी जमिनीवर पडलेल्या वायरचा शॉक लागून ही घटना घडली. शिवसेना नरसेवक विजय चौगुले यांनी या हंडीचं आयोजन केलं होतं.