Goodluck Cafe VIDEO : पुण्यातील गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; व्हिडीओमधून ग्राहकाचा संताप
Glass In Goodluck Cafe Bun Maska : सुरुवातीला बर्फाचा तुकडा वाटला, पण नंतर तपासलं असता ती काच निघाली अशी तक्रार व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पुणे : गुडलक कॅफे हे पुण्यातील खवय्यांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पुण्यातील या प्रसिद्ध कॅफेमध्ये इराणी चहा आणि बन मस्का खाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागलेली असते. मात्र याच गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये चक्क काचेचा तुकडा आढळून आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच्यासोबत हा प्रकार घडला त्या ग्राहकाचे नाव आकाश जळगी असं आहे. त्याने व्हिडीओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक ग्राहकाने चहा आणि बन मस्का मागवला होता. त्या बन मस्कामध्ये त्याला काचेचा तुकडा आढळून आला. संबंधित ग्राहकाने त्याचा व्हिडीओ काढत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना त्याचा जाब विचारला.
आपण एवढ्या लांबून इथे येतो आणि अशा पद्धतीने सेवा मिळते असं म्हणत त्या ग्राहकाने कर्मचाऱ्यांना जाब विचारला. ग्राहकाने व्यक्त केलेल्या संतापावर कर्मचाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याचं दिसतंय. हा प्रकार चुकून झाला असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं.
Goodluck Cafe Pune : एफडीएकडे तक्रार
आकाश जळगी म्हणाला की, "मी आणि माझी पत्नी या ठिकाणी आलो होतो. बन मस्का तोंडात घातल्यानंतर एक कडक वस्तू त्यामध्ये होती. सुरुवातीला वाटलं की तो बर्फाचा तुकडा असेल. पण बाहेर काढल्यानंतर तो काचेचा तुकडा असल्याचं स्पष्ट झालं."
या प्रकरणाची तक्रार आपण पुण्यातील अन्न आणि औषध प्राधिकरणाला दिली असल्याची माहिती आकाश जळगी याने दिली. हा काचेचा तुकडा जर कुणाच्या पोटात गेला असता तर काय झालं असतं? त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Goodluck Cafe Bun Maska : कॅफे प्रशासनाकडून गंभीर दखल
गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार कसा घडला याबद्दल सीसीटीव्हीची पडताळणी सुरू असल्याची माहिती कॅफेच्या व्यवस्थापनाने माध्यमांना दिली. बन मस्कासाठी जो ब्रेड मागवला जातो तो बाहेरून मागवला जातो असं कॅफे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. या प्रकाराची माहिती कॅफेने पुरवठादाराला दिल्याचंही कॅफे प्रशासनाने सांगितलं.
गुडलक कॅफे हे पुण्यातील प्रसिद्ध कॅफे असून 1935 साली त्याची स्थापना झाली आहे. या ठिकाणी बन मस्का, खिमा पाव आणि कॅरेमल पुडिंग खाण्यासाठी लोकांची गर्दी असते.
ही बातमी वाचा:
























