पुणे: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी (Pune Ganpati Visarjan) आठ हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये,यासाठी शहर पोलिस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत सुमारे आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी,अंमलदार आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असतील. मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.(Pune Ganpati Visarjan)

Continues below advertisement


मिरवणुकीतील संशयास्पद हालचालींवर लक्ष


पोलिस आयुक्त, पोलिस सह आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच, गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि केंद्र आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथके मिरवणुकीदरम्यान सतत गस्त घालणार आहेत. मिरवणुकीतील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख मार्गांवरील चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र असतील. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके असतील. सोनसाखळी व मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. तसेच, सर्व लॉजेस, हॉटेलची तपासणी करून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे.


पुणे शहरातील मुख्य १७ रस्ते वाहतूकीसाठी असणार बंद 


विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी तगड नियोजन केलं आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅफिकसह पार्किंगसाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून वाहतूक नियमांसाठीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार आहे. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन निर्माण करण्यात आले आहे. तर शहरात दोन दिवस जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी असणार आहे. शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पुणे पोलिसांनी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. 


वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते


शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड ,केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज  रस्ता, कर्वे रोड,FC रोड, भांडारकर रस्ता पुणे सातारा रोड, प्रभात रोड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.