पुणे : पुण्यात मोठ्या जल्लोषात बाप्पाला(Pune Ganeshotsav 2023) निरोप देण्यात येत आहे. त्याचवेळी पुण्यात वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे पुण्यातील चौकाचौकात पुणेकरांची गर्दी दिसत आहे. भर पावसात पुणेकर मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. एकीकडे ढोल ताशाचा दणदणाट ऐकायला मिळत आहे तर दुसरीकडे पावसाने हजेरी लावल्याने उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळत आहे.


हवामान खात्याने अनंत चतुर्दशीला दुपारनंतर पाऊस येणार असं सांगितलं होतं. त्यानुसार आज  पुण्यात सुमारे साडेतीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे काही प्रमाणात तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र बाप्पाचं रुप पाहून अनेक लोक पुन्हा जल्लोष उरी भरल्याचं पाहायला मिळालं. 


पावसामुळे पुण्यातील अलका टॉकीज चौकात अनेक पुणेकर छत्री हाती घेत बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी थांबले आहे. अलका टॉकीज चौकात तुरळक पाऊस पडत आहे. मात्र पुण्यातील बाकी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे आणि अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे.


आपात्कालीन परिस्थितीत घाबरु नका...


पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याची भीती असते. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि काही सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 101 या क्रमांकावरून अग्निशामक दलाशी संपर्क साधा.गणेशमूर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरीपासून लांब उभे करा.नाव, होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नका.महापालिकेतर्फे नदीकाठी जीवरक्षक नियुक्त केले आहेत, त्यांच्याकडून मूर्तीचे विसर्जन करवून घ्या.एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास जीवरक्षकांना तातडीने माहिती द्या. पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरा. अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या हौदातच करा,अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 


पावसात पण थाटात दगडूशेठ गणपतीची मिरवणूक 


गणाधीश रथावर दगडूशेठ गणपती दिमाखात विराजमान झाले आहे. एक झलक पाहण्यासाठी पुणेकरांची तौबा गर्दी केली आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक थाटात निघाली आहे.यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला आहे.विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे. दगडूशेठ गणपतीला डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पुणेकरांनी गर्दी केली आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav 2023 : अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात; पाहा ड्रोन फोटो...