पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात (Food and Drug Administration) धडाकेबाज कारवाई केली आहे. टोनी दा ढाबा येथील धडक मोहीमेत वाहनाचा पाठलाग करून 47 लाख 22 हजार 300 रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवायांचा धडाका लावला आहे. प्रतिबंधित पदार्थांचा अवैध साठा करणाऱ्यावर अन्न आणि औषध विभागाची करडी नजर आहे.
औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहमेअंतर्गत 1 वाहन जप्त करण्यात आले असून चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत. जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर 1 वर्षाकरीता बंदी घातलेली आहे. तरीही पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक आणि विक्री सुरु असल्याचं दिसत आहे. या संदर्भात माहिती मिळताच थेट कारवाई करण्यात येत आहे.
FDA च्या धडाधड कारवाया...
काही दिवसांपूर्वी तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या कारवाईत बनावट उत्पादनाचं 650 किलोग्रॅम तूप जप्त करण्यात आलं होतं. त्यासोबतच त्याच्या मिश्रणात वापरण्यात येणारा कच्चा मालही जप्त करण्यात आला होता. पुणे शहरातील पाषाण गावातील भगवतीनगर येथे टिन शेडमध्ये लपलेल्या भूमिगत कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारखान्यावर निर्णायक छापा टाकला होता. छाप्यादरम्यान बुधवार पेठेतील रहिवासी असलेल्या संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (38) बनावट तूप तयार करत होता. खाण्यायोग्य सोयाबीन तेल आणि डालडा यांच्या संशयास्पद मिश्रणाचा वापर करून बनावट तूप तयार करताना राजपूतला रंगेहात पकडण्यात आलं होतं.
अशी करा तक्रार ...
याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
अयोध्यानगरीला अभेद्य किल्ल्याचं स्वरुप! शहरात प्रवेश करताना स्थानिकांनाही दाखवावं लागणार ओळखपत्र