पुणे: पुणे महानगरपालिकेच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Election 2026) गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उभे केलेले उमेदवार सचिन खरात गटाचे असल्याचे अजित पवारांकडून सांगितलं जात होतं. परंतु आता सचिन खरात (Sachin Kharat) यांनीच तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कोणत्याच उमेदवारांना आता आमचा पाठिंबा नाही. सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात म्हणून मी अजित पवारांसोबत गेलो होतो. मात्र तशा जागा मिळाल्या नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीतून (Pune Election 2026) मी बाहेर पडत आहे. कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतंच चुकीचं काम करणार नाही. दोन पावलं मागे आले तरी चालेल पण चुकीचं काम करणार नाही, असंही सचिन खरात यांनी म्हटलं आहे.(Pune Election 2026)

सचिन खरात नेमकं काय म्हणालेत?

महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर मी स्वतः रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खरात गट पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत भेट घेतली, भेट घेऊन त्यांना मी एक  पत्रक दिलं आणि मी मागणी केली की सन्मानपूर्वक जागा जर मला दिल्या तर नक्कीच आघाडी करू, अशा आशयाचं मी त्यांना पत्र दिलं होतं. परंतु मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागलेल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर माझा पक्ष चालतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतेही काम करू शकत नाही. एक वेळी राजकीय पाऊल माझं मागे आले तरी चालेल. पण मी कोणतेही चुकीचं काम करणार नाही, असं सचिन खरात यांनी म्हटलं आहे.(Sachin Kharat)

गुन्हेगारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांनी खरातांवर फोडलेलं खापर

'राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही. आमची सचिन खरात यांच्यासोबत युती राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागावर उमेदवार देण्याचा त्यांना अधिकार आहे,' असे म्हणत अजित पवारांनी या साऱ्या प्रकरणाचे खापर खरातांवर फोडत बाजुला जाण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीतील तीन सदस्यांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एबी फॉर्म भरून उमेदवारी दाखल केला आहे.(Sachin Kharat)