मुंबई : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र - मुंबई यांच्या पुढाकाराने नव्याने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025’ वितरणाचा भव्य समारंभ येत्या रविवारी, 25 मे 2025 रोजी सायंकाळी पुण्यातील JW Marriott येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार’, ‘महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार’ आणि ‘डिजिटल स्टार पुरस्कार’ देऊन केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. याशिवाय, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण होईल.

प्रतिबिंब प्रतिष्ठानचा उद्देश 

प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी झाली आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले की, “हा सोहळा फक्त पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरेल. हा उपक्रम नव्या पिढीतील पत्रकारांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारा तसेच समाजपरिवर्तनाला गती देणारा ठरेल.” 

पुरस्कार विजेत्यांची यादी 

‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ यंदा विविध क्षेत्रांतील १८ मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षण, ग्रामविकास, कला, मनोरंजन, सामाजिक कार्य, साखर उद्योग, चिक्की उद्योग, प्रगत शेती आणि बेघर तसेच मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. यात प्राचार्य डॉ. किरण सावे (पालघर), बिग हिट मीडिया (अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी), सचिन वायकुळे (बार्शी), प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे (नांदेड), उमाकांत मिटकर (धाराशिव), मोहन डांगरे (सोलापूर), प्रशांत मोरे (महाबळेश्वर), संजय कोठारी (जामखेड), नामदेवराव खराडे (छत्रपती संभाजीनगर), स्वप्निल परदेशी (पाचगणी), विजय राऊत (छत्रपती संभाजीनगर), संदीप शिंदे (यवतमाळ), शिवराम घोडके (बीड), आतिश शिरसाट (सोलापूर), भास्कर घुले, संतोष ठोंबरे (बार्शी), मानसिंगराव चव्हाण (कोरेगाव) आणि शुभम पसारकर (गडचिरोली) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५ 

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान होणार आहे. यामध्ये सरिता कौशिक (संपादिका, एबीपी माझा), साहिल जोशी (संपादक, मुंबई तक), संजीव उन्हाळे (ज्येष्ठ पत्रकार, छत्रपती संभाजीनगर), भारत चव्हाण (ज्येष्ठ पत्रकार, लोकमत, कोल्हापूर) आणि दिलीप सपाटे (अध्यक्ष, विधीमंडळ वार्ताहर संघ, मंत्रालय, मुंबई) यांचा समावेश आहे.

डिजिटल स्टार पुरस्कार

डिजिटल पत्रकारितेतील योगदानासाठी नितीन पाटील (पोलीसनामा), अश्विनी जाधव (लोकमत डिजिटल), अभिजीत दराडे (मटा डिजिटल), विष्णू सानप (लेटसअप डिजिटल) आणि ओमकार वाबळे (मुंबई तक डिजिटल) यांना ‘डिजिटल स्टार पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

संयोजन समिती

हा भव्य सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या संयोजन समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित होत आहे. यात राजा माने (संस्थापक अध्यक्ष), सतीश सावंत (राज्य उपाध्यक्ष), महेश कुगांवकर (सचिव), नंदकुमार सुतार (राज्य उपाध्यक्ष), केतन महामुनी (सहसचिव), शामल खैरनार (राज्य संघटक), राजू वाघमारे (राष्ट्रीय संघटक), विकास भोसले (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), तेजस राऊत (राज्य सहसंघटक), इक्बाल शेख (राज्य समन्वयक), दिपक नलावडे (सचिव, प्रतिबिंब प्रतिष्ठान), अमोल पाटील (राज्य कार्यकारिणी सदस्य), अजिंक्य स्वामी (उपसचिव, पश्चिम महाराष्ट्र) आणि गणेश हुबे (जिल्हाध्यक्ष, पुणे) यांचा समावेश आहे.

नव्या पिढीला प्रेरणा 

या उपक्रमाद्वारे पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या करिअरला दिशा देण्याचा मानस आहे. समाजसेवा आणि पत्रकारिता यांच्या संगमातून सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याचे उद्दिष्ट या सोहळ्याने साध्य होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.