Darshana Pawar Murder Case : 'प्रत्येकाच्या आयुष्याची एक स्टोरी असते. मात्र हीच स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हा उत्सुक असतात जेव्हा ही स्टोरी सक्सेस स्टोरी बनून पुढे येते', हे शब्द MPSC परिक्षेत राज्यात तिसरी आलेल्या आणि राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवारचे आहेत.  दर्शना पवार हत्या प्रकरणाला तीन दिवस उलटले. तिच्या जाण्याने पुण्यासह महाराष्ट्र हादरला. याच दर्शनानाच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. पुण्यातील स्पॉटलाईट या अकॅडमीमध्ये तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याच कार्यक्रमातील व्हिडीओ  समोर आला आहे. 


या व्हिडीओमध्ये दर्शना तिच्या संघर्षासंदर्भात भाष्य करत आहे. त्याशिवाय तिने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आई- वडिलांना दिलेय.  आपण अपयशी होतो तेव्हा आपण आपल्यातल्या चुका शोधत असतो, मात्र जेव्हा आपण यशस्वी होतो त्यावेळी त्याचं श्रेय सगळ्यांना जातं, असं ती या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. मात्र दोन दिवसातच तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि पवार कुटुंबीयांनी लेकीला गमावलं .
 
वेगवेगळया शहरात पोलीस दाखल


दर्शना पवार हत्या प्रकरणाला तीन दिवस उलटले अजूनही मात्र आरोपीचा शोध लागला नाही. या हत्याप्रकरणी तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं नेमली आहेत. ही सगळी पथकं मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत आहेत. 


वेगवेगळया शहरात राहुलचं लोकेशन


या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राहुलचे आणि दर्शनाचे फोन रेकॉर्ड काढले आहेत. त्यात दर्शना आणि राहुल नेमकं कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा शोध पोलीस या रेकॉर्डच्या माध्यमातून घेत आहेत. त्याशिवाय पोलीस राहुलचं लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं पहिलं लोकेशन बंगलोर, कोलकाता आणि त्याचं शेवटचं लोकेशन चंदीगढ असे दिसून आलेय.  तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रवासादरम्यान राहुल वेगवेगळ्या लोकांच्या फोनवरुन घरच्यांशी संपर्क साधत असल्याचं  पोलीस तपासात समोर आहे. 


राहुलची कुटुंबीयांकडे पैशांची मागणी -


प्रवासादरम्यान राहुलने घरच्यांकडे पैसे मागितले आहेत. त्याच्या घरच्यांनी त्याला सुरुवातील 5 हजार, नंतर 1500 आणि 500 रुपय़े त्यांच्या अकाऊंटवर पाठवले आहेत. राहुलचे वडिल आणि भावाची विचारपूस सुरु आहे. तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचा फोन सुरु होण्याची वाट बघत आहेत. पोलिसांची पथकं या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. राहुल समोर आल्यावरच दर्शनाच्या मृत्यूचं गुढ उलगडेल.