Pune Crime Shashikant Chavan: जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्यावरही गंभीर आरोप, गुन्हेगारांपेक्षाही डेंजर ट्रॅक रेकॉड, तरीही प्रमोशन अन् क्रीम पोस्टिंग
Pune Crime Shashikant Chavan: शशिकांत चव्हाण यांनी चोंधे हगवणे आणि जालिंदर सुपेकर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्वक संबंधामुळे चोंधेला अभय दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी थार गाडीचा उपयोग केला ती थार गाडी संकेत चोंधे याची होती. संकेत चोंधेच्या पत्नीने छळवणूक होत असल्याबाबत त्याच्याविरोधात आणि दीराविरोधात खडक पोलिसात तक्रार दिली होती. यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप संकेतची पत्नी धनश्री चोंधे यांनी केला आहे. मात्र त्यावेळी शशिकांत चव्हाण जालिंदर सुपेकर आणि राजेंद्र हगवणे यांच्या सगळ्या नातेसंबंधांमुळे चोंधे याच्या पत्नीच्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली नाही. यावेळी शशिकांत चव्हाण हे खडकमाळ पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. त्यामुळे शशिकांत चव्हाण यांनी चोंधे हगवणे आणि जालिंदर सुपेकर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्वक संबंधामुळे चोंधेला अभय दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शशिकांत चव्हाण कोण आहेत?
शशिकांत चव्हाण हा जालिंदर सुपेकर यांचा मेहुणा आहे. शशिकांत चव्हाण यांच्यावर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे. सुशील हगवणे आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांना पळून जाण्यासाठी दिलेली थार ही संकेत चोंधे याची होती. संकेत चोंधे यांच्या बायकोने खडक माळ पोलीस स्टेशनमध्ये छळवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
शशिकांत चव्हाण यांच्यावर एकूण तीन एफआयआर दाखल आहेत. 2018 मध्ये खेड पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहेत. त्यासोबतच 2020 मध्येआत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही गुन्हा दाखल आहे. 2020 मध्ये जमिनीच्या वादातून एकावर शशिकांत चव्हाण यांनी कट रचून हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, त्यासोबतच त्यांच्यावर 307 चा गुन्हा देखील दाखल आहे. 2011 ते 2022 या दरम्यानचे सगळे क्रिमिनल रेकॉर्ड असताना शशिकांत चव्हाण यांना तीन वेळा प्रमोशन मिळाला आहे. शशिकांत चव्हाण यांना तीन वेळा प्रमोशन मिळालं. त्यावेळी जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. त्यावेळी शशिकांत चव्हाण यांना क्रीम पोस्टिंग मिळाल्याचे देखील समोर आला आहे, यामध्ये वानवडी लोणी काळभोर आणि खडक पोलीस स्टेशनचा समावेश आहे. त्यासोबतच त्यांच्या वडिलांच्या नावावर अनेक ठिकाणी जमिनी आहेत.
सुषमा अंधारेंचाही शशिकांत चव्हाण यांच्यावर हल्लाबोल
हगवणे केसमधील ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो, आणि त्यांची पदावनती झाली, त्या जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस स्टेशनला पीआय आहेत. शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंधेच्या थार गाडी घेऊन गेले होते, त्या चोंधेंच्या दोन सुनांच्या केसेस होत्या. याच शशिकांत चव्हाण यांच्या अरबो रूपयांच्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी साईट्स सुरू आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांची चौकशी करण्यात यावी, याबाबतची चर्चा आम्ही राज्यपालांसोबत केली, अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि त्यांचा मेव्हणा शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती यावेळी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे.
























