Pune Crime Rave Party : पुण्यात 26 जुलैच्या रात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) छापेमारी करण्यात आली. ज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. पुण्याच्या खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी चालू होती आणि यामध्ये एकनाथ खडसे यांची कन्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचा पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या हाऊस पार्टीतून खेवलकर यांना अटक केली गेली आहे. या छापेमारीत दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर हे रेव्ह पार्टीमध्ये आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. अटक केलेल्यांची रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली जात आहे. तर पोलिसांकडून रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील घरात सर्च करण्यात आले आहे. 

पोलिसांना 'तीन' महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या

या हाऊस सर्चमध्ये पोलिसांना एक लॅपटॉप, तीन पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क आढळल्या आहेत. या तिन्ही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या लॅपटॉपमध्ये आणि पेन ड्राईव्हमध्ये काही फोटोज आणि काही माहिती आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी एबीपी माझा बोलताना गंभीर आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आक्रमकपणे सरकारवर टीका करताना, विषय मांडताना दिसून येत आहेत. सरकारविरोधात सध्या कोणीही बोलताना दिसला तर त्याला दाबण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याची नवी पध्दत सुरु झालीय. जे विरोधात बोलतात त्यांना थेट काही करता येत नाही त्यामुळं कुटुंबियांना टार्गेट केलं जातं, असं त्यांनी म्हटलं आहे. 

कोण आहेत प्रांजल खेवलकर?

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.  

आणखी वाचा 

Pune crime Rave Party: आधी रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडलं, नंतर प्रांजल खेवलकरांच्या हडपसरच्या बंगल्यावर छापा टाकला, पुणे पोलिसांच्या वेगवान हालचाली