Vidyanand Bapat Attack in Pune: पुण्यातील गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) हे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलत असताना एका व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली. बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असे असल्याची माहित समोर आली आहे. संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला असल्याचीही माहिती आहे. (Pune Crime news)
या घटनेनंतर संतोष चव्हाण याला पोलिसांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने अटक केली आहे. संतोष चव्हाण हा राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. या सगळ्या घटनेनंतर त्याने प्रसारमाध्यमांशी ओझरता संवाद साधला. तो टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे. मला काही भूमिका मांडायची नाही. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मी मारणार, असे संतोष चव्हाण म्हणाला.
Pune police: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस काय म्हणाले?
अनोळखी व्यक्तीने बापटांना मारहाण केली. आम्ही घटनास्थळी चौकशी करुन आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहे. या व्यक्ताने बापट यांच्यावर हल्ला का केला, तो कोणत्या हेतूने इकडे आला होता, याचा तपास आम्ही करणार आहोत, अशी माहिती पोलीस डीसीपी कृषीकेश रावळे यांनी दिली. आम्ही विद्यानंद बापट यांची वैद्यकीय चाचणी करुन दिली आहे, आम्ही ते तक्रार देतील, तशी पुढील कारवाई करु. सगळी तपासणी करुन विद्यानंद बापट यांना सुरक्षा द्यायची की नाही, हे आम्ही ठरवू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट हल्ल्यानंतर काय म्हणाले?
मी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का?, असा सवाल विद्यानंद बापट यांनी विचारला. उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे विद्यानंद बापट यांनी म्हटले.
आणखी वाचा
