पुणे : पुणे जिल्ह्याच्या ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील एसएससी परीक्षा केंद्रात सोमवारी सकाळी धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलाने परीक्षा केंद्राच्या वर्गात घुसून दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने (Pune Crime News)हल्ला केला. विद्यार्थ्याने मानेवरील वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र तो जखमी झाला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती असून, ओतूर पोलिसांनी आरोपीसह आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime News)
मुख्याध्यापकांनी दिली घटनेबाबत माहिती
या घटनेबाबत मुख्याध्यापकांनी माहिती देताना सांगितलं की, एका मुलाच्या हातावर वार केले होते, तिथं मोठा गोंधळ झाला होता, आम्ही सगळे गेलो तिथली परिस्थिती हाताळली. आरोपी अकरावीमध्ये शिकतो, त्याला पोलिस स्टेशनला नेलं. ज्या मुलाच्या हातावरती वार झाले त्याच्यावरती औषध उपचार केले, त्यानंतर त्याला रायटर दिला त्या मुलाने परिक्षा दिली आहे. चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चार जण इथे आले होते, त्यांची आधीही भांडण झाली असल्याची चर्चा आहे. एकूण १३ शाळेचे हे केंद्र आहे, रोज पोलिस आणि २ आरोग्य केंद्राचे अधिकारी असतात, अशी माहिती मुख्यध्यापकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.(Pune Crime News)
घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर जखमी विद्यार्थ्यांने दिलेल्या माहितीनुसार, ६ तारखेला देखील त्या मुलांनी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तर ६ तारखेला माझ्या माहितीप्रमाणे असा काही प्रकार घडला नाही, असं मुख्यध्यापकांनी म्हटलं आहे. तो मुलगा सांगत असला तरी देखील आमच्या सीसीटीव्हीमध्ये असं काही दिसत नाही, जर तसं काही घडलं तर पालकांनी आम्हाला ती माहिती द्यायला हवी होती, आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नाही, असंही मुख्यध्यापकांनी सांगितलं आहे.
ही घटना १०.३५ ला घडली, त्यावेळी त्या वर्गामध्ये कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी नव्हता, हे सर्वात मोठं सेंटर आहे, आम्ही बेल वाजल्यानंतर मुलांना गेटमधून आत घेतलं जातं, त्यांचं हॉल तिकीट त्यांचं वर्गात चेक केला जात आहे, अशा घटना रोखण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू, सेंटर मोठं असल्यामुळे मुले खूप येतात, आता यापुढे गेटवरतीच आम्ही हॉलतिकीट चेक करून मुलांना आतमध्ये सोडलं जाईल असंही शाळेच्या मुख्यध्यापकांनी म्हटलं आहे.
