Pune Crime News: बुधवार पेठेतील (Budhwar Peth) वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा निर्घुण खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या महिलेला दररोज बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात (Nanded City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकास अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या 51 वर्षीय आरोपीचे नाव नितीन चंद्रकांत पंडित असे आहे. तो पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आहे. हत्या झालेल्या 40 वर्षीय महिलेचे नाव श्यामली असून ती धायरी येथील रायकर मळा परिसरात राहणारी होती. शनिवारी आरोपीने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटना समोर आल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

50 हजार रुपये घेतले उसणे

उधार दिलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. श्यामली आणि आरोपी नितीन यांची पूर्वीपासून ओळख होती. श्यामली दररोज रात्री बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायासाठी जात होती आणि नितीन तिची ने-आण करण्याची जबाबदारी पार पाडत होता. या कारणामुळे दोघांमध्ये मैत्री देखील निर्माण झाली होती. त्यांच्यातील ओळखीतून श्यामलीने नितीनकडून सुमारे 40 ते 50 हजार रुपये उसणे घेतले होते. 

महिलेची ओढणीने गळा आवळून हत्या 

नितीनने वारंवार पैसे मागूनही श्यामली ते परत करत नव्हती. त्यामुळे घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर नितीनने श्यामलीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची अशी निर्घृण हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी आरोपी नितीन पंडितला तात्काळ अटक केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: रांजणगाव तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक वळण, अनैतिक संबंध अन् आईसह दोन मुलांसह जाळलं, हत्येचं गूढ अखेर असं उलघडलं!

Pune Crime News: बायको अन् मुलगी गावाला गेली, घरी एकटेच, भर दुपारी दार लावलं अन्... पुण्यात शिवाजीनगर पोलीस लाईन घटनेनं हादरलं