पुणे : पुण्यात कोयता हल्ल्याच्या घटनेत वाढ (Pune News) झाली आहे. त्यातच गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने (Koyta Attack) हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी  3 जणांना पोलिसांकडून याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते. अचानक 3 अनोळखी व्यक्तींनी यांनी फिर्यादी यांच्या दुकानाजवळ येऊन, फिर्यादी यांचे टपरीवरील सामान खाली फेकुन नुकसान करुन, त्यातील एकाने त्याचेजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार केले. धर्मेंद्र गुप्ता यांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तात्काळ या तिन्ही आरोपींना अटक केलीय या घटनेचा सी सी टिव्ही फुटेज आता समोर आलं आहे. 


गाडीची लाईट चमकवली म्हणून भररस्त्यात राडा


त्यासोबतच दुसऱ्या घटनेत  गाडीची लाईट चमकवली म्हणून 20 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील कोंढवा परिसरात राडा पाहायला मिळाला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला. कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या महमदवाडी येथे २ तरुण कॉफी पिण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणांच्या डोळ्यावर चमकावली. यातून त्यांच्या दोन्ही गटात वादावादी सुरू झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 


पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान


पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.


इतर महत्वाची बातमी-


"ये नकली संतान..."; आंध्रप्रदेशातून पंतप्रधान मोदींची ठाकरेंवर बोचरी टीका, शरद पवारांवरही साधला निशाणा