Pune Rave Party : रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट; खडसेंचे जावई खेवलेकरांच्या वकिलांचा खळबळजनक दावा, 'कोकेन म्हणून वजन केलं तो पदार्थ...'
Pune Rave Party : रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये डॉ. प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे या रविवारच्या रेव्ह पार्टी प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे.

पुणे : पुण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेलं रेव्ह पार्टी (Pune Rave Party) प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. राजकारणातील बड्या नेत्याच्या जावयाला यामध्ये अटक झाल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई या पार्टीमध्ये सापडले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना छापेमारीत अटक करण्यात झाली होती. या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे, दरम्यान याबाबत दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशातच या प्रकरणामध्ये डॉ. प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे या रविवारच्या रेव्ह पार्टी प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. “रेव्ह पार्टीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेलं आणि कोकेन म्हणून वजन केलेला पदार्थ हा खरंतर कोकेन नव्हताच”, असं विजयसिंह ठोंबरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे तपास यंत्रणांवर आणि या प्रकरणातील प्राथमिक पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.
एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक झाल्याने प्रकरण चर्चेत
एकनाथ खडसेंचे जावई असलेले डॉ. प्रांजल खेवलकर यांना देखील या प्रकरणात अटक केल्याने सुरुवातीपासूनच हे प्रकरण चर्चेत ठरले. सुरुवातीला कारवाई झाली तेव्हा पोलिसांनी हॉटेलच्या परिसरात आणखी तीन तरुणी दिसल्या होत्या. कारवाई सुरू झाल्याने त्या परिसरातून निघून गेल्या, अशी माहिती दिली होती. न्यायालयातही ही माहिती देऊन त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनीच त्याबाबत माहिती देताना म्हटलं की, या तिघींचा त्या रात्रीच्या पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे केवळ संशय निर्माण करण्यासाठीच पोलिसांनी हा दावा केला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा, ड्रग्जचा पुरवठादार अद्याप पोलिसांना हाती लागलेला नाही. कारवाईला तीन दिवस उलटून गेले, तरी ड्रग्ज नेमके कुठून आणले गेले आणि पुरवठादार कोण, याचा तपास अद्याप अंधारातच आहे. या प्रकरणामुळे एका प्रकारे खडसेंना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचंही विरोधक बोलत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
रविवारी (27 जुलै) खराडी परिसरातील स्टे बर्ड, अझुर सूट हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे पहाटे कारवाई करत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या पार्टीचे आयोजक हे माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे होते अशी माहिती देखील समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांच्या नावे 3 दिवसांपासून पार्टी सुरू असलेल्या हॉटेलच्या 3 रुम बुक होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली त्याच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत. तर पोलिसांनी या पार्टीवर कारवाई करत हॉटेलमधून मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा, कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे 3.20 वाजता स्टे बर्ड हॉटेलवर छापा टाकला. खेवलकर यांच्या नावाने बुक केलेल्या रूम नं. 102 मधून डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (41, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (35, पुणे), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (41, पुणे), सचिन सोनाजी भोंबे (42, वाघोली), बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (27, रा. आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (22, रा. औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (23, म्हाळुंगे) या सात जणांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हा शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. खेवलकर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे. पत्नी जरी राजकारणात असली तरी ते मात्र राजकारणापासून दोन हात लांब आहेत, प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसेंचे बालमित्र आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी यांनी बालमित्र असलेल्या प्रांजल खेवलकरसोबत लग्नगाठ बांधली.






















