पुणे: शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी गावातील हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. दाणेवाडीमध्ये एका विहिरीत शीर, हात नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विहिरीत बुधवारी (दि. 12) सकाळी आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. समलैंगिक संबंध माहिती झाल्याच्या कारणातून त्याच जोडप्याकडून माऊली गव्हाणे या 19 वर्षे तरुणाचा अमानुषपणे निर्घृण खून करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


नेमकं काय घडलं?


समलैंगिक संबंध समजण्याच्या कारणातून समलैंगिक जोडप्याकडून माऊली गव्हाणे याला संपवल्याची माहिती समोर आली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे हा या घटनेतील मुख्य आरोपी असून त्याला साथ देणारा दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. दोघांनी नियोजन करून माऊली गव्हाणे याचा खून केला आहे. दोघांचे समलैंगिक संबंध असल्याची माहिती माऊली गव्हाणे याला समजले होते. म्हणून हा खून केल्याचे आरोपींकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.


या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी असलेला सागर गव्हाणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध होते. या बाबतची माहिती माऊली गव्हाणेला माहिती झाले होते. त्याने ही गोष्ट कुणाला सांगू नये, यासाठी आरोपींनी गुरुवारी, 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास माऊली याच्याशी चर्चा करण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावलं. त्याच रात्री 11.30 वाजता भेटण्याचं ठरवलं. त्यानी टॉर्चच्या उजेडाचा इशारा दिला आणि माऊलीला एका ठिकाणी बोलावून घेतलं. यानंतर, दोघांनी माऊलीला गळा आवळून त्याला संपवलं. त्याचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्घृणपणे इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने हात, पाय, धड आणि डोके वेगवेगळे केले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. शीर, एक पाय आणि दोन हात घोड नदीच्या काठावर असलेल्या विहिरीमध्ये टाकण्यात आले, या विहिरीमध्ये हे धड आढळून आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला ,सुरूवात झाली होती.


या घटनेचा तपास करण्याचं आणि अर्धवट अवस्थेमध्ये सापडलेल्या मृतदेहामुळे त्याची ओळख पटवणं आणि तपास करणं हे आव्हान पोलिसांसमोर होतं. गुन्हेगारांनी अतिशय नियोजन करून हा गुन्हा केला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या योग्य तपासामुळे काही दिवसांतच आरोपींना ताब्यात घेऊन सत्य समोर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला गती मिळाली आणि या प्रकरणाचा तपास झाला. या अमानुष हत्येने गव्हाणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी नातेवाईकांनी मागणी केली आहे.