पुणे: पुण्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये अनैतिक संबंधाना (Pune Crime News) अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या साथीने खून केला. रवींद्र काशीनाथ काळभोर (वय 45, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र झोपेत असतानाच मध्यरात्री डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार करून त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुन्ह्याचा छडा लावत शोभा रवींद्र काळभोर (वय 42), गोरख त्रिंबक काळभोर (वय 41, रा. वडाळेवस्ती, लोणी काळभोर) या दोघांना अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.(Pune Crime News)
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंध होते. रवींद्र यांना याबाबत माहिती होती. त्यातूनच पती रवींद्र आणि पत्नी शोभा या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दारू पिऊन रवींद्र सतत शोभाला मारहाण करत होता. त्यामुळे गोरखचा देखील रवींद्रवरती राग होता. शनिवारी (दि. 29) शोभा आणि रवींद्र या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्या वेळी शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थेऊरला गावी निघून गेली. रवींद्रकडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा देखील कंटाळली होती. त्यामुळे प्रियकर गोरख आणि शोभा या दोघांनी रवींद्रला संपवायचं ठरवलं.
दोघांनी एकत्र चारचाकी गाडी घेतलेली
रवींद्र आणि गोरख एकाच गावाचे राहणारे. दोघांच्या घरामध्ये फक्त शंभर मीटरचे अंतर होतं, तर शेतीचा बांधाला बांध होता. गोरखचं रवींद्र यांच्या घरी कायमच येणं-जाणं असायचं. दोघांनी एकत्र चारचाकी गाडी देखील खरेदी केली आहे. तर गोरख याने साडेतीन लाख रुपये रवींद्र यांना दिले होते. रवींद्र यांना दारूचे व्यसन होते. अनेकदा गोरख त्यांना दारू पाजत असे. त्या रात्री देखील शोभा थेऊरला गेल्यामुळे रवींद्र सोमवारी (दि.31) एकटेच घरी होते. त्या दिवशी त्यांनी मद्य प्राशन केले होते. गोरख हा त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला. त्यानंतर रवींद्र अकराच्या सुमारास रवींद्र घराबाहेर झोपले, मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला. त्याने रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार केले. घाव वर्मी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोरख याने घटनास्थळावरून पळ काढला होता.
शोभा आणि गोरख या दोघांचे कॉल
मंगळवारी (दि. 1) सकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, रायवाडी रोड वडाळेवस्ती येथे रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी रवींद्र हे त्यांच्या घरासमोर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. रवींद्र यांचा खून झाला होता.
त्यानुसार पोलिसांनी तपासाची तपास सुरू केला. त्या वेळी त्यांची पत्नी शोभा आणि गावातील व्यक्ती गोरख या दोघांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना दुवे जोडले. रवींद्र यांचा खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी रात्री 9 वाजता आणि मध्यरात्री दोन वाजल्यानंतर शोभा आणि गोरख या दोघांचे कॉल झाल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.