पुणे: शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या, महिला, मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचं चित्र आहे. अशातच पुण्यात माजी नगरसेविकेच्या मुलाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून नंतर तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

तरूणाची आई ही माजी नगरसेविका 

याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित प्रकरणातील तरूणाची आई ही माजी नगरसेविका असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021साली एका जीममध्ये ओळख झाली होती. पीडित तरुणीचा व्यवसाय आहे. ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असे. कालातरांने तरूणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली, त्यावेळी त्याने टाळाटाळ करायला सुरूवात केली. आरोपीचे अन्य मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावलं. तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने प्रेमाच्या तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करुन धमकावलं आणि गरोदर राहिल्यावर गर्भपात देखील केला आहे. २८ वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, 2021मध्ये दोघांची जिम मध्ये ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्नाच अमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. 17 डिसेंबर 2022  ला तरुणाने तरुणीशी मोबाईलवर संपर्क बोलून मला शेवटचे भेटायचे आहे. न भेटल्यास कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली होती नंतर तरुणीने थेट याबद्दल तरुणीने थेट माजी नगरसेविकेला सांगितले. तेव्हा तिला पुन्हा धमकावलं त्यानंतर आरोपीने पीडितेला भेटून लग्न करतो म्हणून सांगितलं आणि बलात्कार करत राहिला. या दरम्यान तरुणी गर्भवती राहिली आणि हे माहीत झाल्यावर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हंटलं आहे. त्यानंतर 2024 मध्येही तरुणी पुन्हा एकदा गर्भवती राहिली त्यावेळीही गर्भपातच्या गोळ्या दिल्या. हा सगळा प्रकार तरुणीने घरी सांगितला. 16 फेब्रुवारी 2025 ला पीडितेला घेऊन आरोपी आळंदीला गेला. आळंदीमध्ये जाऊन लग्न केल्याचंही पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या सगळ्या दरम्यान तरुणीला अजून गर्भपातच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हंटलं आहे. ती या घटनेने घाबरून आजीच्या गावी गेली आणि पुण्यात परतल्यावर तिने पोलिसात तक्रार दिली.