Pune Crime: पुण्यातील मार्केटयार्ड (Pune) परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घडना घडली आहे. गोळीबार करुन तब्बल 28 लाखांची रोकड लंपास करुन चोर पळून गेले आहे. ही घटना दुपारी घडली आहे. घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय पोलिसांसमोर नवं आव्हान यानिमित्तानं उभं राहिलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास पाच ते सहा आरोपी हे पी एम अंगडिया या कार्यालयात आले होते. हे कुरिअरचं कार्यालय असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि पैसे लुटून फरार झाले आहेत. तक्रारदार हे रोज प्रमाणे सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम तपासली होती. काही वेळाने अचानक अज्ञात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले. आरोपींनी तक्रारदाराला बंदूक दाखवली. याचवेळी आरोपींनी तक्रारदाराला कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि पैसे घेऊन लंपास झाले. या सगळ्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. 


सीसीटीव्ही चेकींग सुरु
ही सगळी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या सगळ्या कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. तक्रारदाराची देखील संपूर्ण चौकशी केली. घडलेल्या प्रकरणी पोलीस तपास करत आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील सुरु आहे. मार्केट यार्ड परिसरात रोज भाजी-पाल्यांची आवक असते. शेकडो व्यावसायिक या परिसरात माल खरेदीसाठी येत असतात. रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. अशा कायम वर्दळीच्या परिसरात गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.