पुणे: एकीकडे गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असताना पुण्यातील नाना पेठेत धक्कादायक घटना घडली. नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर या तरुणावर दोन ते चार जणांनी धावत जात गोळीबार केला. या घटनेत आयुष उर्फ गोविंद याचा मृत्यू झाला. जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पुणे पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपास सुरु असल्याची माहिती दिली. आयुष उर्फ गोविंद कोमकर हा 19 वर्षांचा होता. त्याचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. वनराज आंदेकर याची हत्या गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला पुण्यातील नाना पेठेत झाली होती.
वनराज आंदेकरचा नाना पेठेतील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेवट
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला झाली होती. मागील वर्षी ज्याची हत्या झाली तो वनराज आंदेकर आणि आज ज्याची हत्या झाली तो आयुष उर्फ गोविंद कोमकर हे सख्खे मामा - भाचे आहेत. आज ज्या श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष उर्फ गोविंद कोमकरची हत्या झाली. तिथल्या रस्त्याच्या पलीकडील भागात गेल्या वर्षी नाना पेठेत वनराज आंदेकरची हत्या झाली होती. आज ज्याची हत्या झाली त्या आयुष उर्फ गोविंदचे वडील गणेश कोमकर , काका जयंत कोमकर आणि काकू संजीवनी कोमकर हे तुरूंगात आहेत.
पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी जोरदार सुरु असताना पुण्यातील नाना पेठ येते भर गर्दीत विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भर वस्तीत गँग वार पाहायला मिळालं.यात एका 19 वर्षीय तरुणाच मृत्यू झाला आहे. पुण्यातील नाना पेठ येथील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे संध्याकाळी पावणे आठच्या वेळेस ही धक्कादायक घटना घडली आहे. आयुष कोमकर याला हल्लेखोरांनी झाडलेल्या तीन गोळ्या लागल्या.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या खून प्रकरणासंदर्भात माहिती दिली. रात्री पावणेआठच्या सुमाराला आयुष गणेश कोमकर या युवकाची क्लासमधून परत आल्यावर अज्ञातांंनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यानंतर त्याला ससून रूग्णालयात नेण्यात आलं जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरचा भाचा आहे.