पुणे : पुण्यातील गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीतील ९ गुन्हेगारांवर गुन्हे शाखेने ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. त्यामध्ये गोळीबाराचा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे (Pune Crime News) नमूद करण्यात आलेले आहे. मयूर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), मयंक मॉन्टी विजय व्यास (२९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश सतीश राऊत (३२, गावडे चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड), दिनेश राम फाटक (२८, माथवड चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन), आनंद अनिल चांदलेकर (२४, श्रीराम कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), मुसाब ईलाही शेख (३३, सिद्धिविनायक कॉलनी, कोथरूड), जयेश कृष्णा वाघ (३६, रा. केळेवाडी, कोथरूड), अक्षय दिलीप गोगावले (२९, बाराटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), अजय महादेव सरोदे (३२, योगिराज बिल्डिंग, वृंदावन कॉलनी, आझादनगर, यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले.(Pune Crime News )

9 आरोपी अटकेत, 8 फरार

गोळीबाराच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी वापरलेले एक पिस्टल आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपी नीलेश घायवळ याच्या घरझडतीदरम्यान दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी आठ आरोपी फरार आहेत. संबंधित फरार आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.(Pune Crime News )

कट कसा रचला ते तपासात समोर

कोथरूड परिसरात आपल्या टोळीची दहशत कमी झाल्याने वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नीलेश घायवळ याने कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हमराज चौक आणि शास्त्रीनगर परिसरात काही दिवसांत मोठी दहशत निर्माण करा, शस्त्रे आणि पैसे मी पुरवतो, तसेच गुन्हा दाखल झाल्यास बाहेर काढण्याची जबाबदारीही माझीच असेल, असे सांगत घायवळ याने साथीदारांना चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा कट गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी, ६ सप्टेंबर २०२५ रोजी रचण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कटानुसारच १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभे असलेल्या नागरिकांवर गुंडांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

नीलेश अन् सचिन या भावडांच्या कोथरूड भागात बेकायदा इमारती

नीलेश घायवळ व सचिन घायवळ या दोन्ही भावडांच्या कोथरूड परिसरामध्ये दोन बेकायदेशीर इमारती बांधलेलया असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पुणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या गुन्ह्यात १२२ साक्षीदार तपासले आहेत. तसेच ६ साक्षीदारांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत.