Pune Crime News : पुण्यात (pune crime) एका अकरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या माय लेकींनी शिवीगाळ केली. हा अपमान जिव्हारी बेतल्याने त्याने आत्महत्या केली आहे. रुद्राक्ष लुकेश जाधव असं 11 वर्षीय  आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तर यासंदर्भात आशा लुकेश जाधव (वय 32, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, रुद्राक्ष घरी आल्यावर त्याला वारंवार शिवीगाळ करण्याचा प्रकार गेले काही दिवस सुरु होता. आरोपी आणि रुद्राक्ष एकाच परिसरात राहायला आहेत. तो सहावीत शिकत होता. तो आरोपींच्या घरी गेला असताना विद्या आणि तिची आई साधना कांबळे यांनी रुद्राक्ष याला शिवीगाळ केली. त्या रागातून रुद्राक्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रुद्राक्षच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विद्या आणि साधना कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 


रागातून टोकाचं पाऊल
रुद्राक्ष  वारंवार आरोपीच्या घरी जात असे. रुद्राक्षला रोज आमच्या घरी का येतो, असं म्हणत त्याला मायलेकींनी मिळून शिवीगाळ केली होती. याचा रुद्राक्षला प्रचंड राग आला. या रागातून रुद्राक्षने गळफास लावत स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती आहे. त्याच्या आत्महत्येमुळे घरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजारच्या मायलेकींकडून होत असलेली शिवीगाळ मुलाच्या जीवावर बेतली आहे. यामुळे संतापदेखील व्यक्त केला जात आहे. 


अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येत वाढ
पुणे जिल्हात अल्पवयीन मुलाच्या आत्महत्यांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली होती. गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं होतं. बोरी गावात हा प्रकार घडला होता. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने सुसाईड नोट लिहिली होती. ती सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती.  मृत मुलीनं सुसाईड नोटमध्ये लिहल्यानुसार गावातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली होती. या घटेनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. प्रकरणी पोलिसांनी गावातील तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली होती.