Pune Crime News: पुण्यातील विमानतळ पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगाराकडून 5 गावठी बनावटीचे पिस्टल आणि 14 जिवंत राऊंड जप्त केले आहे. पोलिसांना या सराईताची गोपनीय माहिती मिळाली होती. राहुल गोपाळ गवळी असं 35 वर्षीय सराईत गुन्हेगाराचं नाव आहे.


31 जुलैला संध्याकाळच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये राजकीय परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता पेट्रोलिंग करीत असताना फॉरेस्ट पार्क रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेतील लिंबाच्या झाडाखाली एक व्यक्ती थांबलेला असुन त्याचेकडे पिस्टल व राऊंड असुन तो कोणाची तरी वाट पाहत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांना महिती देत त्यांच्या आदेशानुसार सापळा रचून ही करावाई केली. त्याच्याकडे 2, 26,400 रुपये किमतीचे 5 गावठी बनावटीचे पिस्टल आणि 14 जिवंत राऊंड मिळाले. 



दोन दिवसांपुर्वी गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इसमाला बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. अमित शेंडगे असं अटक केलेल्या इसमाच नाव होतं. अमित शेंडगेकडून बारामती पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत औद्योगिक कंपन्या आहेत. त्याच परिसरात काही इसम हे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून तालुका पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावरून पोलिसांना बघताच अमित शेंडगेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.  आरोपीची झडती घेताना त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल एक रिवाल्वर आणि तीन जिवंत काडतुस सापडले होते. ही शस्त्र तो विनापरवाना जवळ बाळगून विक्री करणार होता. त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.


पुणे पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई सुरुच


सध्या पुणे शहरात सराईत गुन्हेगारांवर आणि शहरातील असलेल्या जुगार अड्ड्यांवर घडाकेबाज कारवाई सुरु आहे. दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्यांना देखील पुणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. एकाच दिवशी 8 जुगार अड्ड्यांवर फिल्मीस्टाईल छापा टाकत 94 जणांवर गुन्हा दाखल केला होता.