पुणे: पुण्यात काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेना (Shivsena) युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे (Nilesh Ghare) याच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर कारवर फायरिंग झाल्याचा बनाव निलेश घारे यानेच स्वतः रचला असल्याची माहिती समोर आली होती. स्वतःवर बनावट फायरिंग प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वारजे पोलिसांनी घारेवरती अटकेची कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी निलेश घारे याने त्याच्या कारवर फायरिंगचा बनाव रचना होता.
नेमकं काय प्रकरण?
पुण्यातील शिंदे गटाचा युवा नेता निलेश राजेंद्र घारे याच्या वाहनावर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी थेट फायरींग केल्याची माहिती समोर आली होती. सोमवारी 20 मे रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे याच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळ्या झाडल्या होत्या. निलेश घारे याने स्वतः तो बनावट गोळीबाराचा बनाव रचला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. धमकीचा फोन आल्यानंतर माझ्या गाडीवर गोळीबार झाला, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, पोलीस चौकशीत घारे याच्यावर झालेला गोळीबार त्याने स्वतः रचलेला बनाव असल्याचे समोर आले होते.
निलेश घारे यांच्या जवळच्याच समर्थकांनी हा गोळीबार केला होता अशी माहिती आहे. यामध्ये तीन जणांचा समावेश होता. तिघेजण हे घारे याच्याच जवळचे लोक होते, अशीही माहिती आहे. पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. निलेश घारे याच्यावर त्याच्याच सहकाऱ्यांनी गोळीबार (बनावट) का केला? याचे उत्तर शोधताना पोलिसांना माहिती समजली. सुरक्षेचे कारण देऊन निलेश घारे याला पोलीस संरक्षण हवे होते. त्यासाठीच त्याने गोळीबाराचा बनाव रचला होता, अशी माहिती समोर आली आहे.
वारजे पोलिसांकडून अटकेची कारवाई
बनावट गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर वारजे पोलिसांनी काल (बुधवारी) रात्री निलेश घारे याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. आज (गुरूवारी) निलेश घारे याला पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. घारे हा शिवसेनेच्या युवासेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. काही दिवसांपूर्वी घारे याने स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा बनाव केला होता. शस्त्र परवाना मिळावा आणि पोलिस अंगरक्षक मिळावा म्हणून त्याने गोळीबाराचा बनाव रचला होता अशी माहिती समोर आली आहे. वारजेमध्ये त्यानेच 4 जणांना त्याच्या गाडीवर गोळीबार करायला सांगितलं होतं.