पुणे : कामधंदा कर, चांगला राहत जा, घरखर्चाला हातभार लाव, असा वडिलकीचा सल्ला देणाऱ्या जन्मदात्या वडिलांचा पोटच्या 20 वर्षीय मुलाने कात्री खूपसून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली. वडिलांच्या छातीत आणि पोटात कात्री मारून त्यांचा खून केला. लक्ष्मण मंजुळे (वय 55) असे त्या दुर्दैवी वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय 20) याला बेड्या ठोकून अटक केली. ही घटना सोमवारी रात्री टिंगरेनगरमध्ये घडली. मयत मंजुळे यांचे मेहुणे बाबू रामू दांडेकर यांनी विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दिवट्या मुलाचे अकरावीपर्यंत शिक्षण, कामधंदा काहीच नाही
आरोपी शिवनाथ हा 11 वी पर्यंत शिकला असून तो कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे आजारी असलेले वडील लक्ष्मण मंजुळे मुलगा शिवनाथला काहीतरी काम करून घराला हातभार लाव, चांगला राहा असे समजावत सांगत होते. मात्र, त्यांच्या या सांगण्यावरून दोघांमध्ये वाद होत होता. याच वादातून सोमवारी रात्री घरातील सर्व झोपल्यानंतर शिवनाथने कात्री घेऊन वडिलांच्या छातीत व पोटात खुपसली. मुलाने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या ओरडण्याने आईला जाग आली. यावेळी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही हाताला कात्री लागली. त्यामुळे त्या सुद्धा जखमी झाल्या.
वडापाव तळण्याची कढई डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
दुसरीकडे, हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादात महिलेला मारहाण करुन तिच्या पतीच्या डोक्यात वडा पाव तळण्याची कढई मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी 28 वर्षीय महिला दिपाली गणेश मगर यांनी पुण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा.सदाशिव पेठ,) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्ती गणपती चौकातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला गणेशचतुर्थीच्या दिवशी हा प्रकार घडला.
महिला मागील काही वर्ष ज्ञान प्रबोधिनीसमोरील बाजूला हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, त्या काल (20 सप्टेंबर) पुन्हा याच ठिकाणी आपली हातगाडी लावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी काही दिवसांपासून आपली हातगाडी लावणारी महिलादेखील तिथेच होती. त्यानंतर तक्रारदार महिला आणि दुसरी हातगाडी लावणारी महिला यांच्यात वाद निर्माण झाला. एकमेकींना शिवीगाळ केली. तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली. पतीच्या डोक्यात पाठीमागून येऊन वडा पाव तळण्याची कढई मारुन गंभीर जखमी केलं.
इतर महत्वाच्या बातम्या