पुणे : पुणे कोर्टानं प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर चार अशा एकूण पाच आरोपींची ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कोर्टानं पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली. याशिवाय हे सगळं प्रकरण बनावट असल्याचं देखील विजयसिंह ठोंबरे यांनी म्हटलं.

विजयसिंह ठोंबरे यांनी  आरोपींना न्यायलात हजर करण्यात आलं होतं दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती दिली.  ज्या मुलीकडे हे ड्रग्ज सापडलं होतं त्याच्याकडे गांजा सापडला होता तिला सोडून देण्यात आला आहे म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही तपासाला सहकार्य करत आहोत.  आता आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

एफआयआरआणि पंचनाम्यामध्ये सगळं आहे.  महिलेकडे गांजा आणि कोकेन सापडलं आहे त्याच महिलेला MCR देण्यात आली आहे. प्रांजलने कुठलही ड्रग्स सेवन केलं नव्हतं.  प्रांजलचे महिलेशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत, हे सगळं प्रकरण बनावट आहे,त्या महिलेने हे अमली पदार्थ आणले होते. सगळ ट्रॅप रचला होता, असं विजयसिंह ठोंबरे म्हणाले. 

राहुल आला असेल किंवा आणखीन कोण आला असेल याच्याशी प्रांजलचा काय संबंध आहे.  प्रांजल खेवलकर यांच्याकडे अंमली पदार्थ मिळून आलेला नाही. व्हिडिओ काढले गेले त्या संदर्भात पत्र देऊन उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कुटुंबाची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ देण्यात आले. अंमली पदार्थ सेवनाबाबतचा अहवाल का समोर येत नाही.  व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळ्यांना दिसत आहे की महिला पर्समधून अंमली पदार्थ काढत आहे. 

पोलीस कोठडी वाढवण्यासाठी दिलेली कारणे खोटी आहेत. रिपोर्ट एका दिवसात यायला हवा होता.  रिपोर्ट येत नाही याबद्दल आश्चर्य वाटतं. खेवलकर यांचे फोटो व्हायरल करण्यात आला ते केवळ बदनामी करण्यासाठीच असं देखील विजयसिंह ठोंबरे म्हणाले.

दरम्यान, रोहिणी खडसे आज वकिलांचा कोट घालून न्यायालयात हजर राहिल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे देखील होत्या. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर रोहिणी खडसे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. योग्य वेळी या प्रकरणावर बोलणार असल्याचं म्हटलं. पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला होता. त्यानंतर आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आता पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.