Pune bypoll Oath program : पुणे पोटनिवडणुकीत (Kasba  bypoll election) कसब्याचे विजयी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) आणि चिंचवडच्या भाजपच्या विजयी आमदार अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांचा आज विधिमंडळात (Oath program) शपथविधी पार पडला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी शपथ घेतली. 


मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने " असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली. आमदार म्हणून जे कर्तव्य हाती घेणार ते निष्ठापूर्व पार पाडणार असल्याचं ते म्हणाले. याचवेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनीही शपथ घेतली. त्यांनीदेखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करुन शपथविधीला सुरुवात केली.   


कसबा-चिंचवडची यंदाची पोटनिवडणूक अतितटीची


कसबा-चिंचवडची यंदाची पोटनिवडणूक फार अतितटीची झाली. कसब्यात दुरंगी लढत होती. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत बघायला मिळाली. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्या तगडी लढत होती.  मोठ्या मताधिक्यानं रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे भाजपचा मागील 28 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला. त्याचप्रमाणे भाजपच्या अश्निनी जगताप, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्या तिरंगी लढत होती. त्यात 30 हजाराहून अधिक मताधिक्क्याने अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्यामुळे भाजपचा चिंचवडमध्ये विजय मिळाला. 


भाजपचा बालेकिल्ला ढासळला


यापूर्वी कसब्यात 1991 मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यात वसंत थोरात हे कॉंग्रेसकडून निवडून आले होते. त्यानंतर 1995 ते 2023 पर्यंत कसबा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र रविंद्र धंगेकर यांनी 28 वर्षानंतर कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या विजयामुळे कॉंग्रेसला आणि महाविकास आघाडी बळ प्राप्त झालं.


लक्ष्मण जगतापांनंतर पत्नी आमदार


चिंचवडमध्ये 2009पासून 2019 पर्यंत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप निवडून आले होते. लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा अपक्ष लढले होते आणि त्यानंतर दोन टर्म ते भाजपकडून लढले. सलग तीन टर्म आमदार असल्याने त्यांनी चिंचवड शहराचा बराच विकास केला. त्यानंतर त्यांचा कर्करोगामुळे निधन झालं आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. त्यादेखील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांचाच आज शपथविधी पार पडला.