Pune Bypoll election :  पुण्यातील कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा  पोट निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 26 तारखेला मतदान पार पडणार आहे. याच निवडणुकीसाठी कसबा मतदार संघातून भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासोबतच महाविकास आघाडीचा उमेदवार देखील उद्याच अर्ज दाखल करणार आहे. अद्याप मविआचा उमेदवार ठरलेला नाही मात्र कुठल्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे अर्ज भरण्याच्या वेळी भाजप आणि कॉंग्रेस आमने-सामने येणार आहे.


पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकाच वेळेस म्हणजे साडे नऊ  वाजता कसबा गणपती मंदिरासमोर जमण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. 


भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार अजूनही जाहीर व्हायचे आहे. मविआकडून कसब्यात कॉंग्रेसचा उमेदवार असणार आहे तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी उमेदवार असणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. कसब्यात महाविकास आघाडीकडून  नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 


दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी कसबा मंदिरापासून पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही पक्षाचे नेते आमने सामने येणार आहे.


उद्याचा दिवस महत्वाचा...


पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 26 तारखेला मतदान पार पडणार आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. दोन्ही पक्षाकडून नेमके उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होणार आहे. त्यासोबतच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्याकडून प्रचाराला सुरुवात देखील होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून मात्र सोशल मीडियावर प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे.