Ravindra Dhangekar : "कसबा हा भाजपचा (Kasba Bypoll Election Result) बालेकिल्ला नव्हता. सगळ्या पक्षामुळे भाजप निवडून येत होते. ही निवडणूक जनतेनी हातात घेतली होती. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाला आहे. कसबा भाजपचा गड नाही तर हा गड जनतेचा आहे," अशी पहिली प्रतिक्रिया कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून धंगेकर हे आघाडीवर होते. विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फक्त कॉंग्रेसचेच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते हा जल्लोष साजरा करत आहे.


"या विजयाचं श्रेय मी कोणत्या नेत्याला नाही तर फक्त मायबाप जनतेला देतो. या जनतेनंच मला निवडून आणलं आहे. कसबा मागील अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ही निवडणूक सोपी नव्हती. मात्र पहिल्या दिवसापासून विजय मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले होते. ही निवडणूक सोपी नव्हची मात्र जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि सोपी केली," असंही ते म्हणाले.


सगळ्यांचे आभार मानणार..


सगळ्या जनतेचे घरी जाऊन आभार मानेन आणि मला साथ दिलेल्या नेत्यांचंही आभार मानणार आहे. त्यानंतर गिरीष बापटांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. कार्यकर्त्यांकडून 'हू ईज धंगेकर' अशी घोषणाबाजी सुरु आहे. प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषणात हु इज धंगेकर.. तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. चारचाकीत मी जात नाही कारण चारचाकीने सगळीकडे जाणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून मी दुचाकीने फिरतो. हा धंगेकर आमदार झाल्यावरही बदलणार नाही जनतेसाठी हा त्यांचा रवी भाऊच राहणार असल्याचं ते म्हणाले.


कार्यकर्त्यांचा जल्लोष


गुलाल, फटाके फोडून कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. धंगेकरांवर असलेला जनतेचा विश्वास पाहून त्यांच्या पत्नी भावूक झालेल्या बघायला मिळाल्या. कसब्याच्या काही प्रभागांमध्ये धंगेकरांचं चांगलं वर्चस्व आहे. त्याच्यामुळेच ते निवडून आले आहेत. शिवाय टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज होता. त्यामुळे भाजपचं वर्चस्व असलेल्या प्रभागाने भाजपला डावलल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या या विजयामुळे मागील 28 वर्षाचा भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. हा विजय भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर कसब्याच्या विकासाची धुरा जनतेकडून धंगेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे धंगेकर कसबेकरांचा नेमका कसा विकास हे पाहावं लागणार आहे.