पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी चांगलीच बोकाळलीय. नशाखोरी, बड्या बेट्यांचे कारनामे, महिलांवरील अत्याचार आणि गुंडगिरीने पुणे (Pune) शहरात कायद्याचं शासना राहिलंय की नाही, असा प्रश्न उद्धभला आहे. पुणे शहरातील सुस येथे बिल्डरने तुफान राडा घातल्याची बातमी आहे. एका बिल्डरने (Builder) रहिवाशांना चक्क दंडुक्याने मारहाण केली असून महिलांदेखतच अश्लील शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यामुळे, पोलिस (Police) नेमकं काय करतात आणि पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुस येथील लगतच्या सोसायटी धारकांसोबत सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 


बिल्डरने केलेल्या मारहाणीप्रकरणावरुन रात्री उशिरापर्यंत हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सुस येथील तीर्थ टॉवर्सच्या लगत यशवंत निम्हण या बिल्डरची साईट सुरू आहे. मात्र, खासगी रस्त्याची जागा नेमकी कोणाची, यावरून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच आज बिल्डर जेसीबी घेऊन तीर्थ टॉवर्स बाहेर पोहचले. मग तीर्थ टॉवर्सचे रहिवाशी बाहेर आले अन् वादाला तोंड फुटले. त्यावेळी, बिल्डर निम्हण यांनी थेट दंडुक्याने काहींना मारहाण केली, अगदी महिलांदेखत अश्लील शिवीगाळ ही केली. नंतर हिंजवडी पोलिसांना या राड्याची कल्पना दिली गेली. 


पोलीस घटनास्थळी येताच प्रकरण थंडावले. नंतर बिल्डरला घेऊन पोलीस येत असताना रहिवाशांनी गाडीची डिकी तपासण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी डिकी तपासली असता लाकडी दांडके आणि बॅट्स आढळल्या आहेत. त्यावरून बिल्डर कट रचून आल्याचा आरोप तीर्थ टॉवर्सच्या रहिवाशांनानी केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. मात्र, या घटनेवरुन पुन्हा एकदा पुण्यातील बिल्डर लॉबीची दहशत आणि गुंडगिरी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे, पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही समोर येत आहे. 


हेही वाचा


मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो