पुणे : पुण्यातील मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आमदार सुनील शेळके यांनी याबाबत माहिती दिली आहे. नदी पात्रात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. 6 जणांवर आयसीयूत उपाचर सुरु आहेत. तर,30 ते 32 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पूल कोसळल्यानंतर पर्यटक वाहून जात असल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
पर्यटक वाहून जातानाचा नवा व्हिडिओ समोर
कुंडमळा येथील पूल कोसळल्यानंतर 20 ते 25 पर्यटक वाहून गेले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. प्राथमिक अंदाजानुसार काही जण वाहून गेले होते. या दाव्याची पुष्टी करणारा व्हिडिओ समोर आला आहे. नव्यानं समोर आलेल्या व्हिडिओत चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला पर्यटक मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळतं.
एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. कुंडमळा येथील पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. लोकांना दुसरा पर्याय नसल्यानं या ठिकाणी लोकांकडून दुचाकीचा वापर करण्यात येत होता. काही वर्षांपूर्वी पूल धोकादायक झाल्यानं दुचाकीसाठी वापर बंद करण्याबाबतचा फलक लावण्यात आला होता. मात्र, त्याचा वापर सुरुच होता. हा पूल शेलारवाडीतील दोन मळे शेलार मळा आणि भेगडे मला यांना जोडणारा होता.
गेल्या दोन तासांपासून बचाव कार्य सुरु आहे. जी लोकं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत, त्यांना वाचवण्यात आलं आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बचावकार्य अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्यानं पुलाचा कोसळलेला भाग उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पुलाचं लोखंड अधिक वजनदार असल्यानं क्रेनकडून पुलाचा भाग उचलण्यास अपयश येत आहे. घटनास्थळी दोन क्रेन दाखल झाल्या असून त्याद्वारे पूलाचा कोसळलेला भाग उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकप्रतिनिधी घटनास्थळी
मावळचे आमदार सुनील शेळके या घटनेची माहिती मिळताच तातडीनं दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेतील 6 जखमींवर आयसीयूत उपचार सुरु आहेत.