पुणे : पुण्याजवळील बोपदेव घाटात झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज (25 नोव्हेंबर) रोजी दुपारी अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील बोपदेव घाट येथे प्राणांतिक अपघात घडला. या अपघातामधील जखमी विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. ससून, रुबी हॉल आणि भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.  बोपदेव घाटातून उताराने येणारा आयशर टेम्पो क्रमांक MH 04 FD 7654 याने समोरून जात असलेल्या हुंडाई व्हेन्यू कार क्रमांक MH 12 YN 3247 हिला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टेम्पोची धडक बसली.

Continues below advertisement

या अपघातात एकूण पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यापैकी सिद्धेश राजे, विशाल दांगडे व मोहिनी चौधरी या तीन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर श्वेता तळेकर व सोहम घंगाळे हे दोन विद्यार्थी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत आणि जखमी विद्यार्थ्यांची माहिती :

1. सिद्धेश राजे – ससून रुग्णालय (उपचारादरम्यान मृत्यू)2. विशाल दांगडे – रुबी हॉल क्लिनिक, वानवडी (उपचारादरम्यान मृत्यू)3. मोहिनी चौधरी – भारती हॉस्पिटल (उपचारादरम्यान मृत्यू)4. श्वेता तळेकर – रुबी हॉल क्लिनिक, वानवडी5. सोहम घंगाळे – इनामदार हॉस्पिटल, कोंढवा

Continues below advertisement

अपघातातील आयशर टेम्पो व चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची  प्रक्रिया सुरू आहे.

बारामतीत मस्तीखोर थार चालकाने वाहतूक पोलिसाला उडवलं 

बारामतीमध्ये वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसाला एका थार चालकानं उडवले आहे. बारामती मधील सम्यक चौक या ठिकाणी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कर्तव्य बजावत होते. त्यावेळी काळ्या काचा असलेली थार आली असता ती थांबवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला. मात्र त्या मस्तीखोर थार चालकाने वाहतूक पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले यांच्या थेट अंगावर गाडी घातली आणि गाडी जोरात पळवत फरार झाला. यात भोसले यांना दुखापत झाली असून सुदैवाने झालेल्या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.  

या मस्तीखोर थार चालकांवर गंभीर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्यात महिंद्रा थार चालक धीरज शेडगे या चालकावर, जीवे मारण्याचा आणि कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मस्तीखोर थार चालकाचा सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून शोध घेण्याचे काम सुरू आहे.