पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
भाजप पदाधिकारी ओंकार कदम हा महापालिकेच्या आवारात येऊन दमदाटी करतो, त्यासोबतच महिला अधिकाऱ्यांना त्रास देतो, अशी तक्रार आमच्याकडे आली होती.

पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे (Pune) शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यातच, महानगरपालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला भाजप (BJP) पदाधिकारी ओंकार कदम यांच्याकडून दमदाटी केल्याचा आणि छळ केल्याचा प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून ही बाब घडत असतानाही महापालिकेने यावर दाद दिली नाही. त्यामुळे, संबंधित महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली. महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. त्यानंतर, आता ओंकार कदम यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. आम्ही महापालिकेचा सगळा भ्रष्टाचार उघड केल्यामुळे माझ्यावर महापालिका खोटे आरोप करत असल्याचं ओंकार कदम यांनी म्हटलं आहे.
भाजप पदाधिकारी ओंकार कदम हा महापालिकेच्या आवारात येऊन दमदाटी करतो, त्यासोबतच महिला अधिकाऱ्यांना त्रास देतो, अशी तक्रार आमच्याकडे आली होती. त्यावर, आता आम्ही कारवाई करून ओंकार कदम याला महापालिकेच्या आवारात बंदी घातली आहे, असं महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. जर ओंकार कदम यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर आम्ही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करू आणि जर अधिकाऱ्यांचे आरोप खरे ठरले तर आम्ही पोलिसात तक्रार देऊन कदम यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करू, असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या घटनेनं महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता, त्यावेळी तत्कालीन आयुक्त राजेश भोसले यांच्याकडे कदम याची तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी महापालिकेने कोणतीही दखल घेतल्याचे समोर येत नाही. फक्त पोलिसांना एक गोपनीय पत्र देऊन या घटनेसंदर्भातली माहिती दिली होती. जर एखाद्या महिला अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्यांकडून किंवा बाहेरच्या व्यक्तीकडून त्रास होत असेल, दमदाटी केली जात असेल तर एवढी गंभीर बाब असूनही राजेश भोसले यांनी त्यावेळी कारवाई का केली नाही? शिवाय वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यावेळी काय करत होते? असे अनेक प्रश्न यांनी निमित्ताने उपस्थित होत आहेत. आता, महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आणि कारवाईच्या गतीला पोहोचल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, संबंधित भाजप पदाधिकाऱ्याचे भाजपमधील बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर आले असून मंत्री महोदयांसमवेतही त्याचे फोटो आहेत. त्यामुळेच, प्रशासनावर त्याचा दबाव आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
























