पुणे : महावितरणच्या (MSEB) वीजचोरीच्या घटना सातत्याने घडतात, अनेकदा शेतकऱ्यांवर वीजचोरीचा आरोप केला जातो. मात्र, उद्योगविश्वासतही सरकारी वीजेचा सातत्याने चोरी होत असते. पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये अशीच वीजचोरीची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून ही चोरी करतण्यात येत होती, अखेर या कंपनीच्या मालकाकडून तब्बल 19 लाख 19 हजारांचा दंडही वसुल केला आहे. एका औद्योगिक (MIDC) ग्राहकाकडून रिमोटचा वापर करुन केली जाणारी वीजचोरी महावितरणने नुकतीच उघडकीस आणली असून, या ग्राहकाकडून महावितरणने 19 लाख 19 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा लोकेश चंद्र यांनी वीज वितरण हानी कमी करण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तयार केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहा. अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सुरु केली. तेंव्हा मे. गणेश प्रेसिंग या औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळले. वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य महावितरणने जप्त केले आहे. तसेच या ग्राहकाला मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या 77,170 युनीटच्या वीजचोरी पोटी 19 लाख 19 हजार 362 रुपयांचा दंड व 2 लाख 30 हजारांचे तडजोड आकाराचे देयक देत दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार