Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
Pune Minor Suspects Parade Case : 'एबीपी माझा'च्या बातमीची आणि राज्य मानवाधिकार आयोगाच्या नोटिसीची तातडीने दखल घेतली असून मानवाधिकार पथकाकडून पोलीस ठाण्याची झाडाझडती घेण्यात आली.

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या प्रकरणातील अल्पवयीन संशयित आरोपींना पोलीस गाडीच्या बोनेटला बांधून, भररस्त्यात त्यांची धिंड काढल्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. या अमानुष प्रकाराला जबाबदार धरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पवार (Mansing Pawar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 'एबीपी माझा'ने 4 ऑगस्ट रोजी हे वृत्त दाखवल्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाने (SHRC) या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत पुणे पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली होती.
बातमी आणि नोटिसीनंतर गुरुवारी राज्य मानवाधिकार आयोगाचे पथक थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. या पथकाने पोलीस उपायुक्त (DCP) आणि इतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची कसून झाडाझडती घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली.
Pune Case Background : आरोपींची धिंड
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुलै महिन्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, हत्येचा तपास करताना पोलिसांनी कायद्याची पायमल्ली करत तीन ते चार आरोपींना पोलिसांच्या शासकीय गाडीच्या बोनेटवर दोरीने बांधून त्यांची भररस्त्यातून धिंड काढली. एवढेच नाही तर आरोपींना गुडघ्यावर चालायला लावून मारहाण केल्याचे आणि त्यावेळी मृताच्या कुटुंबीयांनी आरोपींना चपलेने मारल्याचे व्हिडीओ समोर आले होते.
Human Rights Commission Notice : 'जंगल राज' असा उल्लेख
या अमानुष घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मानवाधिकार आयोगाने (State Human Rights Commission Action) पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar), स्थानिक डीसीपी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून खडसावले. 'न्यायालयात आरोप सिद्ध होण्यापूर्वीच संशयितांची अशी उघड्यावर धिंड काढणे हे पूर्णपणे चुकीचे असून, हा एक प्रकारे 'जंगल राज'चाच प्रकार आहे,' असा कडक ठपका मानवाधिकार आयोगाने ठेवला.
Mother Attacks Suspect : मृत तरुणाच्या आईचा आरोपीवर चपलेने हल्ला
या धिंडीदरम्यान पोलीस ठाण्याबाहेर एक वेगळाच नाट्यमय आणि अनपेक्षित प्रकार घडला होता. आरोपींना गाडीच्या बोनेटला बांधून आणले जात असताना, तिथे उपस्थित असलेल्या मृत तरुणाच्या संतप्त आईने आरोपींवर झेप घेत त्यांना चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
Pune Inspector Transferred : पोलीस निरीक्षकाची बदली
एबीपी माझाच्या ग्राऊंड रिपोर्टिंग आणि मानवाधिकार आयोगाच्या कडक भूमिकेनंतर पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. दिवसभर चाललेल्या चौकशी आणि झाडाझडतीनंतर पोलीस निरीक्षक मानसिंग पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, या प्रकरणातील इतर दोषी कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
ही बातमी वाचा:






















