Pune Ashadhi Wari 2026: आळंदीतून आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी (Warkari) पुण्यात दाखल झाले आहेत. सततचा पाऊस आणि आळंदीतील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री यांनीही वारकऱ्यांना आळंदीत न जाता पुण्यातूनच (Pune news) वारीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात आले आहेत. महापालिकेकडून या वारकऱ्यांसाठी विविध शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक वारकरी रस्त्यांच्या कडेला राहुट्या उभारून या मुसळधार पावसात मुक्काम करत आहेत. वारकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचीही कमतरता असल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी पावसाचे पाणी गळत असून वर्गखोल्यांमध्येही पाणी साचत असल्याची तक्रार वारकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वारकऱ्यांकडून होत आहे. (Pune Marathi news)

दरम्यान, आषाढी वारीनिमित्त आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सहभागी होण्यासाठी हिंगोलीतील अनेक पालख्या आळंदीत गेल्या आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पालख्यांचे ट्रक पाण्याखाली गेले आहे. ट्रकमध्ये महिनाभरासाठी साठवून ठेवलेलं अन्नधान्य, गॅस सिलेंडर, स्वयंपाकाचं साहित्य पूर्णपणे पाण्यात वाहून गेलं असून ते खराब झाले आहे. या परिस्थितीमुळे हिंगोलीतील शेकडो वारकरी आळंदीमध्ये अडचणीत सापडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान हिंगोली जिल्हा प्रशासनाने आळंदीतील प्रशासनाशी संपर्क साधून मदत करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

Pune School for Warkari: वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यातील 101 शाळांना आठवडाभर सुट्टी

आळंदी आणि देहू या ठिकाणी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे वारकऱ्यांची राहण्याची सोय करण्यासाठी पुण्यातील शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पुणे महापालिकेच्या (Pune News) 101 शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी देण्यात आली होती. मात्रस शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. या शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल, असे सांगण्यात आले होते. जेणेकरून वारकऱ्यांच्या निवासात कोणताही अडथळा येणार नाही. मात्र, पुणे महानगरपालिकेचे हे दावे फोल ठरताना दिसत आहेत. 

Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून पाणी सोडलं

पुण्यात मुसळधार पाऊस असून काल रात्रीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. मध्यरात्री धरणाचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा 842 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. मात्र, सकाळपर्यंत धरण 100 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. सध्या खडकवासला धरणातून 27 हजार 203 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे. 

Wari news: पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर!

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या महापुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तेथील पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. ही सर्व विकासकामे तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना दिले आहेत.

आगामी आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल होत आहेत. परंतु, मुसळधार पावसामुळे व पुरामुळे या भाविकांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती शौचालये वाहून गेली आहेत. तसेच आळंदी येथील जलशुद्धीकरण केंद्र पाण्याखाली गेले असून, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे पथदिवे कोसळले असून बहुतांश भागातील रस्ते उखडले आहेत, तर नदीवरचे संरक्षक कठडेसुद्धा काही ठिकाणी तुटले आहेत. यामुळे आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आळंदीतील भाविकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुध्दा मंगळवारी दुपारी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, आळंदीत पोहोचलेल्या वारकऱ्यांशीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.

या महत्त्वाच्या चर्चेनंतर आळंदी येथील अत्यावश्यक कामांसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपये मंजूर केले असून, अवघ्या काही तासांत यासंबंधीचा शासन निर्णय (GR) सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने प्रत्यक्ष कामांना सुरुवातही केली आहे.

या मंजूर १० कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपयांचा निधी "वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठीच्या विशेष अनुदानातून" दिला जाणार आहे. याअंतर्गत आळंदी नगरपरिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था व इतर अत्यावश्यक कामांसाठी ३ कोटी रुपये, नवीन पथदिवे आणि पोल उभारणीसाठी १ कोटी रुपये, तसेच भाविकांच्या आरोग्यासाठी शौचालय व स्वच्छतागृह उभारणीसाठी १ कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच, पूरग्रस्त भागातील रस्ते आणि पुलांची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी "विशेष रस्ता अनुदान" योजनेअंतर्गत अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामधून नगरपरिषद हद्दीतील पूल, रस्ते आणि त्यांच्या लगतच्या गटारांची कामे केली जाणार आहेत. 

आषाढी वारीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाने घेतलेल्या या १० कोटींच्या तातडीच्या निर्णयामुळे आळंदीतील पूरग्रस्तांना आणि वारकरी भाविकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा

खडकवासला धरण तुडुंब भरलं, मध्यरात्रीच्या अंधारात दरवाजे उघडले, पुण्यात हायअलर्ट