Pune Accident News :  पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. 

Continues below advertisement

गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू

गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील राजेंद्र बबन मोरे (वय 55) आणि सविता राजेंद्र मोरे (वय 42) हे दुचाकी क्रमांक एमएच 12 एफएच 4696 वरून साताऱ्याकडे जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या मागील सातारा लेनवर त्यांच्या दुचाकीला गॅस टँकर क्रमांक एपी 03 टीई 5759 ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही टँकरखाली ओढले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत फेकली गेली होती.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर आणि दुचाकी दोन्ही वेगात होती. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Continues below advertisement

चालकाचे नियंत्रण सुटून टँकर रस्त्याशेजारील झाडावर आदळला, हजारो लिटर पेट्रोल-डिझेलची मोठी गळती

 
मनमाड येथून 'साईबाबा हायवे पेट्रोलियम' कडे 12 हजार लिटर इंधन घेऊन जाणारा अनुष ट्रान्सपोर्टचा टँकर दहिवेल शिवारात भीषण अपघाताचा बळी ठरला. काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या मालकीचा हा टँकर जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिली, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर रस्त्याशेजारील झाडावर जोरदार आदळला. टँकर पलटी झाला नसला तरी झाडाच्या धडकेने टाकीचा काही भाग कापला गेल्याने हजारो लिटर पेट्रोल-डिझेलची मोठी गळती झाली. इंधन वाहत असल्याची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी बाटल्या आणि कॅन घेऊन इंधन गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. इंधन गळतीमुळे आगीचा मोठा धोका निर्माण झाल्याने साक्री आणि पिंपळनेर येथून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ पाचारण करण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी हजारो लिटर इंधन मात्र वाया गेले आहे.
 

महत्वाच्या बातम्या:

Kej Accident News: भरधाव कारवरचं नियत्रंण सुटलं; कार पलटी होऊन केजच्या तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ