पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरती आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात (Pune Accident) झाला. या घटनेमध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नारायणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात (Pune Accident) मृत्यू झालेल्यांपैकी पाच जण एकाच गावातील असल्याची माहिती आहे, एकाच गावातील पाच जणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातामध्ये (Pune Accident) चार महिला, चार पुरुष आणि एका 5 वर्षांच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत. अपघातातील मृतांची नावे देखील समोर आली आहे. 


मृत व्यक्तींची नावे


1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष
9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे


या नऊ जणांपैकी विनोद केरूभाऊ रोकडे, युवराज महादेव वाव्हळ, चंद्रकांत कारभारी गुंजाळ, गीता बाबुराव गवारे,  भाऊ रभाजी बडे हे पाच जण हे राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील आहेत. त्यामुळे या गावावरती शोककळा पसरली आहे. पुणे नाशिक हायवेवरती आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Pune Accident) झाला आहे. एका आयशर टेम्पो चालकाने मागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला जोरदार धडक दिली. ते वाहन पुढे जाऊन एसटी बसला धडकले आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये या नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


काही जण जखमी झाले आहेत, जखमींवरती शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, या आयशरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला उडवलं आणि तो पळून गेला. पण, पोलिसांनी त्याला शोधलं. पुढे आयशरला पकडलं. खरा अपघात या आयशर चालकामुळे घडला आहे, अशी माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.