पुणे : हॉटेलवर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकाचे निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेलवर कारवाई केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन अखेर मागे घेतले आहे. त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी (Pune Police News) दिले. डेक्कन पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक (Pune Police Sub Inspector) संदीप कदम यांनी काठीने कॅफेधील कॉफीचे काही ग्लास पाडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यानंतर त्यांना सेवेतून २९ जून रोजी निलंबित केले होते.(Pune Police News)
दरम्यान मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या कॅफेवर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकावरच निलंबनाची कारवाई केल्याने पोलिस दलात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. या आधी पोलिसांनी त्या कॅफेविरुद्ध सहा खटले दाखल केले होते, मात्र तरीही ते सुरू राहत होते हे समोर आले. समाज माध्यमात या कारवाईबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. उपनिरीक्षकाने त्याचे कर्तव्य पार पाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ जुलै रोजी झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत कदम यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात उशिरापर्यंत सुरू असलेले हाॅटेल तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्या, पानटपऱ्या रात्री दहापूर्वी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांनी मध्यरात्री दोन पर्यंत सुरू असलेल्या गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) संबंधित हाॅटेलविरुद्ध कारवाई केली होती.(Pune Police News)
Pune Police News: नेमकं काय आहे प्रकरण?
सहा जूनला संदीप कदम हे रात्रपाळीवर कार्यरत होते. दरम्यान रात्रीच्या सुमारे पावणेदोनच्या सुमारास शिरोळे रोडवरील 'फ्लाइंग जिप्सी' कॅफेमध्ये ते गेले. त्या वेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती. यावेळी कदम यांनी कॅफेत प्रवेश केला आणि हातातील काठीने कॅफेच्या काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्य पदार्थ खाली पाडले. तसेच तेथे बसलेल्या ग्राहकांना तत्काळ उठून बाहेर जाण्यास सांगितले आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सोशल मिडीयावरती या कारवाईबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. उपनिरीक्षकाने त्याचे कर्तव्य पार पाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ जुलै रोजी झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत कदम यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली.
