पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान कॉन्फरन्स रूममध्ये जातील. तिथे सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केल्या जात असलेल्या लस निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ठिकाणी लस बनवली जाते आहे त्या प्लांटला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सीरम इन्स्टिट्यूट भेटीचा कार्यक्रम एक तासाचा असणाार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोजक्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठीच्या तीन शहरांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आज हैदराबाद मधील भारत बायोटेक सुविधा केंद्राला भेट दिली. "स्वदेशी कोविड लसीबद्दल हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधा केंद्रामध्ये माहिती देण्यात आली. लसीसंदर्भात आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांची टीम या कार्यात वेगाने प्रगती व्हावी यासाठी आयसीएमआर बरोबर काम करत आहेत.", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. येथील झायडस केडिला मध्ये डीएनए वर आधारित स्वदेशी लस विकसित होत आहे त्याबद्द्ल जास्त माहिती घेणे हा या भेटीमागील उद्देश होता.“झायडस केडिलामध्ये तयार होत असलेल्या डीएनएवर आधारित स्वदेशी लसीबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठी आज अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. या कामासाठी परिश्रम घेत असलेल्या टीमचे मी कौतुक करतो.. त्यांच्या या कार्यप्रवासात भारत सरकार नेहमीच त्यांच्या सोबत आहे.” , असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात नमूद केले आहे.