Pune Political News: काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कालमाडींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं. गेल्या अकरा वर्षांपासून काँग्रेसने कालमाडींपासून दूर राहणंच पसंत केलं.मात्र आता याच कालमाडींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या शुक्रवारी होणाऱ्या उद्धघाटनासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , मंगलप्रभात लोढा अशी भाजप नेत्यांची मोठी रांग पाहायला मिळणार आहे . त्यामुळं इतर अनेक नेत्यांप्रमाणे कालमाडींनाही भाजप पावन करून घेणार का?, असा प्रश्न विचारला जातो आहे .
शुक्रवारी (2 ऑगस्ट) संध्याकाळी पुणे फेस्टिव्हलचं रंगारंग कार्यक्रमांच्या साक्षीनं उद्घाटन होणार आहे . चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार यावेळी उपस्थित असणार आहेत . मात्र सर्वाधिक चर्चा होणार आहे ती भाजप नेत्यांच्या उपस्थितिची . कारण पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा असे अनेक भाजप नेते हजेरी लावणार आहेत . सुरेश कालमाडींनी सुरु केलेल्या पुणे फेस्टिव्हलचं हे 34 वं वर्ष आहे . गणेशोत्सवांदरम्यान साजऱ्या होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलने पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घातलीय . मात्र सुरुवातीपासून पुणे फेस्टिव्हल कलमाडींचा फेस्टिवल म्हणूनच ओळखला गेलाय . मात्र ज्या कालमाडींवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करून कारवाईची मागणी केली होती त्याच कालमाडींच्या मांडीला मांडी लावून भाजप नेते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत . त्याचबरोबर सहा तारखेला होणाऱ्या मिस पुणे स्पर्धेला अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत . यावर हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे असं स्पष्टीकरण कालमाडींनीं दिलं आहे .
दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गैरव्यवहार केल्याबद्दल सी बी आय ने 2011 साली कालमाडींना अटक केली होती . लागलीच काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं . राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात ढिसाळपणा करून देशाचं ९६ कोटींचं नुक्सना केल्याचा कालमाडींवर आरोप ठेवण्यात आला . मागील अकरा वर्षात या खटल्याचा निकाल लागू शकला नाही . या काळात काँग्रेसने कलमाडींना दूर ठेवणंच पसंत केलं . मात्र गेल्या काही दिवसांपासून 87 वर्षांचे कलमाडी पुन्हा एकदा सक्रिय झालेत . कालमाडींना मानणारा मोठा वर्ग पुणे काँग्रेसमध्ये आहे . काही दिवसांपूर्वी ते पुणे महापालिकेतही आले होते . त्यामुळं आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तर ही जवळीक साधली जात नाहीये ना असा प्रश्न विचारला जातो आहे.
चंद्रकांत पाटील यांनी हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यात राजकारण नको असं म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय . कलमाडी आणि भाजपच्या या जवळिकीबाद्दल काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी टीका केली आहे . भाजपची ही दुटप्पी भूमिका असेल असं मोहन जोशी म्हणाले आहे. .
राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा कायमस्वरूपी शत्रू नसतो हे राजकारण्यांचं आवडतं वाक्य असतं . मात्र या वाक्याचा वापर करणारे राजकारणी सामान्य मतदारांना गृहीत धरतात . आपण भूतकाळात केलेले आरोप लोक विसरातील असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट्राचारी म्हटलं जात होतं त्यांना पावन करून घेतलं जातं.
ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच नेत्यांना त्यांचं उपयोगमुल्य लक्षात घेऊन कालातंराने पावन करून घेतलं . देशपातळीवर सुखराम , एन . डी . तिवारी , एस . एम. कृष्णा अशी अनेक उदाहरणे आहेत. राज्यात तर अशा नेत्यांची फोऊजच भाजपमध्ये सक्रिय आहे . सुरेश कलमाडी विरुद्धचा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे . त्याचा निकाल लागला तर कलमाडींची वर्णीही त्या नेत्यांमध्ये लागू शकते का ? पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने हा प्रश्न विचारला जातोय .