बारामती: ज्या बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सगळं उभं केलं, त्या शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास अर्ध्या तास थांबल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रतिभा पवार या गेल्या काही दिवसांमध्ये युगेंद्र पवारांचा प्रचार करत होत्या, त्यामुळे देखील या अडवण्यामागे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर सोशल मिडियावरती अजित पवारांवर हल्लाबोल करण्यात येत आहे. 


सोशल मिडियावर प्रतिक्रिया


प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना गेटवर अडवल्यानंतर सोशल मिडियावरती व्हिडिओ शेअर करून अजित पवारांवर हल्लाबोल केला जात आहे, त्यामध्ये "बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये जाण्यासाठी व्हिसा लागतो का? बारामती वेगळा देश घोषित केला का? निवडणुकीत इतका राग की प्रतिभा काकीना खरेदीला जाण्यासाठी थांबवले! जे कुटुंबाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? उद्या मतदान दिले नाही तर बारामतीकराना पाणी, वीज सगळ बंद करणार का?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 




ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांचा रस्ता...


महाविकास आघाडीच्या अधिकृत सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंट वरती हा व्हिडिओ शेअर करून अजित पवारांवर खरमरीत टीका केली आहे. "आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली..! देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही.ह्या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत सौ. सुनेत्रा पवार.
ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांचा रस्ता तुम्ही आज अडवलंय", अशी पोस्ट महाविकास आघाडीच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आली आहे. 




नेमकं काय घडलं? 


शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जात होत्या. त्यांची गाडी गेटवरती आल्यानंतर त्यांना अडवण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवलं होतं. त्यांची गाडी आतमध्ये सोडली नाही. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याची माहिती आहे.या व्हिडिओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारत होत्या, तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केलं का? तुम्हाला गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितलं. आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद केलं आहे का? तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केलं का? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे. . आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायचं आहे. आम्हाला शॉपिंग करायची आहे असं त्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं दिसत आहे. 


अर्ध्या तासांनंतर सोडलं आत


अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी सुरक्षारक्षकाने सोडलं. जवळपास त्या अर्धा तास गेटवरचं थांबवण्यात आलं होतं. मात्र, या अडवणुकीचे कारण समजू शकलेलं नाही. बारामतीमध्ये याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. नक्की त्यांना अडवण्याचं काय कारण असावं याबाबतचे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत.