पुणे: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती, याची माहिती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना असावी, असा मोठा दावा विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित दादांचे विश्वासू अण्णा बनसोडेंनी (Anna Bansode) केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हाती देण्यात कमालीची घाई सुरु आहे, मात्र मला याची कल्पना नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्याचवेळी येत्या 12 फेब्रुवारीला अजित पवार आणि जयंत पाटील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा करणार होते, असा दावा ही शरद पवारांनी केला. याबाबतची कल्पना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना असावी. असा मोठा दावा बनसोडेंनी केला. आजचा शपथविधी हा वरिष्ठांच्या आग्रहाने होत असल्याचं ही बनसोडेंनी (Anna Bansode) नमूद केलं. शरद पवार आपले दैवत आहेत, त्यामुळं आपण पवार साहेबांशी चर्चा करुन पुढचे निर्णय घ्यायला हवेत का? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं बनसोडेंनी म्हटलं आहे. (Anna Bansode)
कायदेशीर अडचणींमुळं सुनेत्रा वहिनींचा घाईघाईने शपथविधी - सुनील शेळके
घटनेतील कायदेशीर बाबींमुळं सुनेत्रा वहिनींना घाईघाईने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागत आहे, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी स्पष्ट केलं आहे. अजित दादांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी ही प्रक्रिया पार पाडावी लागती आहे, यावरुन आपण तांत्रिक अडचण समजून घ्यावी. हा आमच्या पक्षाचा विषय असल्यामुळं शरद पवार साहेबांना या बाबी माहीत असतीलचं, असं नाही, असं ही शेळकेंनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा वहिणींकडे द्यावी, आजच्या बैठकीत अशी मागणी ठामपणे करणार आहे, असा दावा ही शेळकेंनी केला. दोन्ही राष्ट्रवादीचं 12 फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होतं, म्हणून आज शपथविधी घेतला असं म्हणणं चुकीचं ठरेल. मात्र पुढच्या पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल, असा विश्वास शेळकेंनी व्यक्त केलाय. (Anna Bansode)
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं शरद पवार म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचं, ही तारीख अजितदादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती. पण, अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे, असं शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आगामी काही दिवसांत एकत्र येणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
